‘कथा शिवरायांची’ या नाट्यरूप सादरीकरणाला शिवभक्तांची दाद
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे आणि योगदानाचे अतिशय प्रभावी दर्शन घडविणाऱ्या ‘कथा शिवरायांची…’ (शिवजन्म ते शिवराज्याभिषेक) या सामूहिक नाट्यरूप कथाकथनाचे प्रत्ययकारी सादरीकरण शिवभक्तांनी नुकतेच अनुभवले. या प्रभावी सादरीकरणानंतर कसबा पेठ येथील लाल महालाची वास्तू छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमून गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांनिशी अफाट सेनेने घेरलेल्या लाल महालात शाहिस्तेखानाला जी अद्दल घडवली, तो ऐतिहासिक दिवस शिवतेजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून हिंदू महिला सभेच्या वतीने ‘कथा शिवरायांची’ हा शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा आलेख मांडणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. हिंदू महिला सभेच्या सहा मैत्रिणींनी पारंपरिक वेशकेशभूषा करून, वाद्यवृंदासह गवळण, भारूड, जोगवा, पाळणा, पोवाडा, निवेदन…यांचा आधार घेत हा कार्यक्रम साभिनय सादर केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली संहिता वसुधाताई मेहेंदळे यांनी संकलित आणि दिग्दर्शित केली होती. हे कथानक प्राची सप्रे, सुनीता अभ्यंकर, प्राची गोडबोले, वंदना जोगळेकर, स्मिता नातू आणि सुधा राजगुरू यांनी अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचवले.
मध्ययुगीन काळातला महाराष्ट्रातला साडेतीनशे वर्षांचा पारतंत्र्याचा, जुलमाचा, अन्यायाचा अंधार भेदून, संत एकनाथांची ‘बया दार उघड’ ही आर्त हाक त्या जग्जननी आदिमायेने ऐकली आणि किल्ले शिवनेरीवर महापराक्रमी, महाधोरणी, महामुत्सद्दी शहाजीराजे आणि सकलसौभाग्यसंपन्न जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. बारा मावळ एकत्र करून, कोवळ्या वयाच्या शिवरायांनी दुर्ग रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. तोरणा ताब्यात घेऊन राजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. बारा मावळं सुरक्षित करणारे बळकट दुर्ग शिवरायांनी बुलंद बुरुज आणि तटबंदीने सजवले. शिवरायांचे हे कर्तृत्व विजापूर दरबारात पोचल्यावर, दरबारातील सर्वात बलवान, प्रभावी सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आला. सईबाईंच्या अकाली वियोगाचे दु:ख मनात ठेवूनच शिवरायांनी खानाचा खात्मा केला.
पाठोपाठ सिद्दी जोहरने पन्हाळ्याला बळकट वेढा घालून शिवरायांची पुरती कोंडी केली. बाजीप्रभूंच्या अपूर्व पराक्रमाने आणि बलिदानाने गजापूरची खिंड पावनखिंड झाली. सुरतेची साहसी लूट, शहाजीराजांचा अपघाती मृत्यू, मिर्झाराजे आणि दिलेरखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा भेट आणि कैदेतून करून घेतलेली सुटका, बहलोलखानाची स्वारी, प्रतापरावांचे बलिदान, पन्हाळ्याची अविश्वसनीय स्वारी आणि शिवराज्याभिषेकाची शुभमंगल घटिका…असा शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचा कालपट, या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर आला. पल्लवी पिळणकर (हार्मोनिअम) आणि धनंजय चिंचणीकर (तबला) यांनी साथसंगत केली.
याविषय अधिक माहिती देताना हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले म्हणाल्या, शिवराज्याभिषेकाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने हिंदू महिला सभेच्या सदस्यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाची निर्मिती केली. हिंदू महिला सभेच्या नवरात्र महोत्सवाच्या ७५ व्या वर्षांतील पदार्पणाचेही औचित्य यामागे होते. समस्त हिंदू आघाडीने हा कार्यक्रम शिवतेजदिनी, प्रत्यक्ष याच ऐतिहासिक वास्तूत आणि याच दिवशी सादर करण्याची संधी आम्हाला दिली आहे, याचा आनंद आणि कृतज्ञता मनात आहे.” या कार्यक्रमाचे अधिकाधिक प्रयोग होत राहावेत, रायगडावरील राजदरबारात कार्यक्रम सादर करता यावा असा मानस असल्याचेही नमूद केले.
