Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

मातृशक्तीचा सन्मान ठरणार यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; दहा हजार महिलांचा गौरव

पुणे :वाघोली येथे १८ ते २२ मार्चदरम्यान होणाऱ्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान यंदा मातृशक्तीला देण्यात आल्याने वाघोलीसह पंचक्रोशीतील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सन्मान मिळाल्याचा आनंद व्यक्त करत महिलांनी यंदाची कुस्ती स्पर्धा आयुष्यभर स्मरणात राहील अशी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर आयोजित “मातृशक्ती जिंदाबाद” या कार्यक्रमात वाघोलीतील मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्पर्धेच्या नियोजनासह महिलांच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना मालती गोगावले म्हणाल्या की , ” या कुस्ती स्पर्धेसाठी भव्य असे क्रीडांगण उभारले आहे आणि त्याला स्वर्गवासी अजित दादा पवार यांचे नाव देण्यात आले आहे यंदाच्या याच कुस्ती स्पर्धेत महिलांसाठी विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी देखील वेगळे गॅलरी करण्यात आली आहे या भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी सुसज्ज असे पार्किंग व्यवस्था आहे करण्यात आली आहे यामुळे यंदाची ही कुस्ती स्पर्धा मातृशक्ती गाजवणार एवढे नक्की. ”

हया वेळी पूजा सणस म्हणाल्या, “या स्पर्धेचे उदघाट्न महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, यासाठी महिलांनी जास्त संख्येने उपस्थित राहून मातृ शक्तीचे दर्शन द्यावे. त्याचबरोबर या पाच दिवसांमध्ये उत्कृष्ट रिल बनवणाऱ्याला, फोटो काढणाऱ्याला आणि रॅप करणाऱ्याला देखील बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. यंदाची कुस्ती स्पर्धा सगळ्यांच्या स्मरणात राहील एवढे नक्की.”

सोनाली सातव आणि सुजाता सातव म्हणाल्या की, “यंदाची स्पर्धा केवळ कुस्ती स्पर्धा न राहता मातृशक्तीच्या सन्मानाचा उत्सव ठरणार आहे. वाघोली तसेच पंचक्रोशीतील उच्चशिक्षित आणि विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्याचा रामकृष्ण सातव पाटील फाउंडेशनने निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाची ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मातृशक्तीच्या सन्मानामुळे विशेष ठरणार आहे.”

प्रियांका रामकृष्ण सातव म्हणाल्या की, “ही केवळ स्पर्धा नसून आपल्या सर्वांसाठी एक सण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील महिलांनाच नव्हे तर इतरांनाही सोबत घेऊन या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन आहे. मातृशक्ती हीच मुलांवर संस्कार करणारी शक्ती आहे. त्यामुळे कुस्ती स्पर्धा पाहायला येताना आपल्या मुलांनाही सोबत आणावे, जेणेकरून आपल्या परंपरा व संस्कृतीचे धडे त्यांना देता येतील. ही स्पर्धा आपल्या घरातीलच कार्यक्रम आहे. महिलांसाठी कोणतेही काम कठीण नसते. कुस्ती ही केवळ पुरुषांसाठीच आहे ही धारणा आज बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वाघोलीसह पंचक्रोशीतील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी.”

या कार्यक्रमाला सुजाता सातव, सुनीता सातव, प्रियंका सातव, मालती गोगावले, रेश्मा पाचरणे, वंदना वरघडे, रेणुका पठारे, ज्योती सातव, पूजा सणस, शितल खांदवे, पूजा पठारे, रोहिणी जाधव, पूजा गोते, सारिका जाधवराव, कविता जगताप, कोमल काळभोर, गायत्री काळभोर, पूजा काळभोर, रिंकू काळभोर, शिल्पा गोते, भारती कांचन, रुपाली सातव, प्रीती जगताप, मोनिका सातव, कविता दळवी यांच्यासह वाघोलीतील अनेक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading