Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

महापुरुषांच्या गोष्टी जेथे सांगितल्या जातात तेथे सावरकर जन्माला येतात : शरद पोंक्षे

पिंपरी  : साहित्यिक, नाटककार, समाजसुधारक, क्रांतिकारक, तत्त्वचिंतक अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विविध रूपे आहेत. सावरकर यांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली तरी आजही विरोधक त्यांना का घाबरतात असा थेट सवाल सावरकर यांचे अभ्यासक, व्याख्याते आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला. सावरकर यांनी शब्द कधी फिरवला नाही, हिंदुत्व कधी सोडले नाही. असा महामानव ६० वर्षांपूर्वी जगातून निघून गेला; पण त्यांचे विचार आजही सर्वांना मार्गदर्शन करत आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, हिंदुस्थान या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून जय मातृभूमी युवा मंच यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह समाप्तीनिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर  चिंचवड येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जय मातृभूमी युवा मंचचे अध्यक्ष अनंत कोऱ्हाळे, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे सचिव कृष्णा वैद्य उपस्थित होते. शितल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर बर्वे यांनी आभार मानले.

धर्मासाठी कसे जगायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले. महापुरुषांच्या गोष्टी जेथे सांगितल्या जातात तेथे सावरकर जन्माला येतात, असे सांगून शरद पोंक्षे म्हणाले, सावरकर गेल्यानंतर त्यांचा पक्ष, कार्यकर्ते कोणीही मागे राहिले नाही. त्यामुळे सावरकर यांच्याविषयी कोणी काहीही बोलतो. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी ज्या पायावर उभी आहे तीच देशाला घातक आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

सावरकर यांचे कार्य सांगताना पोंक्षे म्हणाले, सामान्य घरातील लोकांना झगडत मोठे व्हावे लागते. २३ ते ५४ हे वय समाजात रुजण्याचे असते. पण नेमके त्याच वयात सावरकर लोकांपर्यंत पोहचू शकले नाहीत. याकाळात ते शिक्षा भोगत होते. त्यावेळी काँग्रेस देशात फोफावली होती. ज्यांना राजकारणात उतरायचे त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय नव्हता. काँग्रेसची विचारसरणी मान्य नसतानाही अनेकांना त्या पक्षात राहावे लागत होते. सावरकर वयाच्या ५४ व्या वर्षी बंधमुक्त झाले तेव्हा सर्व समाज त्यांच्याकडे आशेने बघत होता.

ते पुढे म्हणाले, ब्रिटिशांनी ज्या सुधारणा केल्या त्या समाजासाठी नाही तर स्वत:च्या सुखासाठी केल्या. असंतोषातून भारतीयांनी संघटना, पक्ष स्थापन करू नये म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्याच माणसाला पेरून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. इतिहासाचा अभ्यास केला तर हे उघड सत्य लक्षात येते. कारण ब्रिटिशांविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी असंतोषाची ठिणगी चेतविली. त्यातून जन्म झाला बाळ गंगाधर टिळक नामक वणव्याचा. चापेकर बंधूंनी रँडला मारले; त्यानंतर क्रांतिकारकांची संख्या वाढू लागली त्यातून असंतोष वाढू लागल्यानंतर ब्रिटिशांनीच काँग्रेसची स्थापना केली.

स्वातंत्र्य याविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, हिंदू आणि मुस्लिम कधीही एकत्र येऊ शकत नाही, हे ओळखून इंग्रजांनी राजकारण केले. त्याच विचारसरणीवर स्थापन झालेल्या काँग्रेसचा विस्तार वाढत होता पण वयाच्या ५४ व्या वर्षी बंधमुक्त झाल्यावर सावरकरांनी हिंदू महासभेचे नेतृत्व केले. काँग्रेस तळागाळात रुजलेला असताना त्या प्रवाहाच्या विरोधात ते उभे राहिले. काँग्रेसच्या विरोधात प्रखरपणे उभे राहिलेले ते प्रथम व्यक्ती होते. भविष्यातले सगळे धोके पत्करून काँग्रेसची विचारधारा ते जिवाच्या आकांताने सांगत होते. पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर पुढे अनेक वर्षे काँग्रेसने आपल्यावर राज्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading