बिग बॉस मराठीच्या घरात ट्रिपल एंट्री, मनोरंजन आणि ट्रिपल ट्रबल!
बिग बॉस मराठीच्या घरातून रोशन भजनकर यांची एक्झिट झाल्यानंतर आता खेळात येणार आहे जबरदस्त ट्विस्ट! प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना मिळणार आहे सीझनचा सर्वात मोठा धक्का, कारण घरात होणार आहेत तब्बल तीन वाइल्ड कार्ड एन्ट्रीज संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे. हिंदी सिरीयल्समध्ये झळकलेली देखणी मराठी मुलगी रेवा आता बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःची छाप पाडायला आणि खेळ जिंकायला येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मनं जिंकलेला आणि मालिकाविश्वातून मनावर राज्य करणारा लाडका संकेत ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. अनेक रिअॅलिटी शोज गाजवलेली संस्कृती देखील या स्पर्धेत उतरली असून तीही ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने घरात प्रवेश करणार आहे. आता यांच्या एन्ट्रीने घरातील समीकरणे कशी बदलणार ? कोण कोणावर हवी पडणार ? राखी यांना कसे नामोहरम करणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ट्रिपल एन्ट्री, ट्रिपल मनोरंजन आणि घरातील सदस्यांसाठी ट्रिपल ट्रबल निश्चित. पहा बिग बॉस मराठी दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
दरम्यान, बिग बॉस मराठी – भाऊचा धक्कामध्ये रितेश भाऊंनी सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. काही सदस्यांचं कौतुक करत त्यांनी त्यांच्या खेळाचं समर्थन केलं, तर रुचितासमोर त्यांनी आपलं परखड मत स्पष्टपणे मांडलं. गँगअप करणाऱ्या सदस्यांना त्यांनी ठाम शब्दांत सल्ला दिला. सिंगल राखीसाठी बिग बॉसकडून सरप्राइज देखील मिळाले. रितेश भाऊंसमोर प्राजक्ताने तन्वीबद्दल आपलं मत मांडलं असता त्यावरही त्यांनी चोख उत्तर दिलं आणि तन्वीला मोलाचा सल्लाही दिला. त्यामुळे या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ ठरला अधिकच दमदार आणि थरारक. घरामध्ये येत्या आठवड्यात काय घडणार ? कोण जाणार नॉमिनेशनमध्ये आणि कोण होणार सेफ ? कोण होणार घरचा कॅप्टन? हे बघणे रंजक असणार आहे.
