Tuesday, April 21, 2026
Latest NewsPUNE

“संगीतही प्रतिकात्मक असते”: टी.एम. कृष्णा यांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा उलगडा करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : “मी संगीत विश्वातून आलो आहे, जे स्वतःच प्रतीकात्मकतेने नटलेले आहे; आणि याच वारशातून मला मानवी प्रतीकांविषयी सखोल ओढ वाटू लागली,” अशा शब्दांत ख्यातनाम गायक टी.एम. कृष्णा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे शुक्रवारी त्यांच्या ‘वी द पीपल ऑफ इंडिया – डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. हे पुस्तक म्हणजे भारताच्या अस्मितेचा कणा असलेल्या राष्ट्रीय प्रतीकांचा घेतलेला एक तात्त्विक आणि ऐतिहासिक शोध आहे. यामध्ये भारतीय तिरंगा, राष्ट्रगीत, ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य, राजमुद्रेवरील अशोकस्तंभ आणि भारतीय संविधानाची उद्देशिका यांच्या सांस्कृतिक व वैचारिक गाभ्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रगल्भ विश्लेषण टी.एम. कृष्णा यांनी केले आहे.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कला आणि संस्कृती विभागाच्या संयोजिका आरती किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘पलाश’ (PALASH) हा एक अभिनव सांस्कृतिक उपक्रम आहे. केवळ धोरणात्मक चर्चांपुरते मर्यादित न राहता, कलेच्या माध्यमातून विचारांना गती देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक जाणीवपूर्वक पाऊल आहे. ‘पलाश’च्या निमित्ताने अभिजात कला आणि लोकपरंपरा एका व्यासपीठावर येतात; जिथे कला, अस्मिता आणि सर्वसमावेशकता यांवर एक प्रगल्भ संवाद घडवून आणला जातो.

कार्यक्रमादरम्यान प्रख्यात राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्याशी संवाद साधताना टी.एम. कृष्णा यांनी अत्यंत मार्मिक विचार मांडले. ते म्हणाले, “मुळात प्रतीकांचे अस्तित्व कशासाठी? लेखक म्हणून जेव्हा तुम्ही लेखणी हातात घेता, तेव्हा असा प्रश्न मनात न आणता तुम्ही थेट विषयाच्या गाभ्यात शिरता. परंतु, अतिशय मूलभूत स्तरावर पाहिले तर संगीत—जे माझे कर्म आहे—ते स्वतःच प्रतीकात्मक आहे. वास्तविक, कोणतीही कला हा एक ‘प्रतीकवाद’ असतो.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी एखादा राग आळवतो, तेव्हा ती एक अमूर्त संकल्पना असते. तिला कोणताही लौकिक किंवा शब्दशः अर्थ नसतो; तो राग म्हणजे खुर्ची किंवा टेबल यांसारखी दृश्य वस्तू नसते. संगीत विश्वातील वावरण्यामुळे प्रतीकात्मता ही आपल्या जगण्याचा जणू अविभाज्य भागच होऊन जाते. मला वाटते, प्रतीकांविषयीच्या माझ्या जिज्ञासेचे मूळ याच सांगीतिक वारशात दडलेले आहे.”

या अनुषंगाने अधिक भाष्य करताना टी.एम. कृष्णा म्हणाले, “प्रत्येक प्रतीक हे स्वयंभू आणि सामर्थ्यशाली असते; त्यांतील काही प्रतीके आपल्या मनावर ठळकपणे कोरली जातात, तर काही कदाचित सहज नजरेला पडत नाहीत, परंतु त्यांचे अस्तित्व चिरंतन असते.” ते अधिक स्पष्ट करताना म्हणाले, “‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद आपल्या अवतीभवती इतक्या वेळा येते की, अनेकदा आपण त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. असंख्य पुलांवर ‘अशोक स्तंभ’ विराजमान असतो, महान सम्राटाच्या नावाने आपण रस्ते ओळखतो. त्याचप्रमाणे, आपल्या संविधानाची उद्देशिका ही आता राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी प्रतिष्ठेचा असा एक उत्कट उद्घोष बनली आहे की, ‘सीएए’ आंदोलनांसारख्या संघर्षाच्या काळातही तिचे सामूहिक पारायण केले गेले.”

“ध्वज हे निश्चितच एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. मी नेहमी म्हणतो की, तो केवळ ‘तिरंगा’ नसून ‘चतुरंगा’ आहे, कारण त्यात चार रंगांचा अंतर्भाव आहे. माझ्या मते, ध्वजातील निळा रंग हा दलित समाजाचे सामर्थ्य, सविनय कायदेभंगाची वृत्ती आणि उपेक्षितांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. तो आपल्या ‘निषेध’ आणि ‘असहमती’ व्यक्त करण्याच्या मूलभूत अधिकाराचा एक बुलंद हुंकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विविध दलित संघटनांच्या चळवळीतूनच निळा रंग खऱ्या अर्थाने जनमानसात रूजला, हे आपण जाणतोच. तो जनसामान्यांच्या अस्मितेचा स्वर आहे. ध्वजाच्या मध्यभागी असलेले हे निळे ‘धम्मचक्र’च आपल्या समाजात आणि राज्यव्यवस्थेत न्याय प्रस्थापित होण्याची ग्वाही देते,” असे श्री कृष्णा यांनी नमूद केले.

टी.एम. कृष्णा यांच्या लेखनशैलीचे वेगळेपण अधोरेखित करताना प्रा. सुहास पळशीकर म्हणाले, “संगीत आणि एकूणच कलाविश्वात, कलाकारांनी ज्वलंत सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिका घेणे ही अत्यंत विरळ घटना आहे. हे केवळ कर्नाटक संगीतापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावरही हेच वास्तव आहे. त्याहूनही दुर्मिळ गोष्ट म्हणजे, स्वतःच्या कलेचे मर्म आणि त्यामागचे शास्त्र इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने मांडणे; जे श्री कृष्णा यांनी दक्षिण भारतीय संगीताच्या संदर्भात आधीच साध्य केले आहे. परंतु, जेव्हा एखादा सर्जनशील कलाकार आमच्यासारख्या व्यावसायिक अभ्यासकांच्या आणि विचारवंतांच्या क्षेत्रात अधिकारवाणीने प्रवेश करतो आणि इतिहास, तत्त्वज्ञान व राजकारण यांसारख्या गहन विषयांवर इतक्या विचापूर्वक पद्धतीने भाष्य करतो, तेव्हा ती एक अभूतपूर्व घटना ठरते. हे पुस्तक नेमक्या याच विलक्षण श्रेणीत मोडते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading