Tuesday, June 9, 2026
Latest NewsPUNE

सदभावना वृद्धाश्रमाला पालकांची गरज आहे.

पुणे : बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे संयुक्त कुटुंब पद्धती कमी होत असताना अनेक वृद्धांना आधाराची गरज भासत आहे. अशा निराधार, निपुत्रिक, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांसाठी गुजरातमधील राजकोट येथे ‘विनुभाई बचूभाई नगरेचा परिसर’ या ठिकाणी भव्य ‘सदभावना वृद्धाश्रम’ उभारण्यात येत आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या खर्चातून साकारत असलेल्या या प्रकल्पात १४०० खोल्यांमध्ये ५००० वृद्धांची मोफत राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या सदभावना वृद्धाश्रमात जात, धर्म किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेदभाव न करता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. येथे राहणाऱ्या वृद्धांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सध्या ७०० हून अधिक माता या वृद्धाश्रमात वास्तव्यास असून त्यापैकी सुमारे ४०० जण अंथरुणाला खिळलेल्या आहेत.

३० एकर परिसरात आणि २० लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या संकुलात सात टॉवर्स असून प्रत्येक टॉवर ११ मजली असेल. जैन समाजातील वृद्धांसाठी स्वतंत्र टॉवर व मंदिराची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

वृद्धांच्या सर्वांगीण काळजीसाठी येथे २४ तास वैद्यकीय सेवा, फिजिओथेरपी केंद्र, नियमित आरोग्य तपासणी, आधुनिक निवास व्यवस्था, ग्रंथालय, गेम रूम, सत्संग सभागृह तसेच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची सोय करण्यात आली आहे. कर्करोगग्रस्त, कोमात असलेले आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले निराधार व्यक्तींसाठी स्वतंत्र विभागही सुरू करण्यात आला आहे.

वृद्धांना सन्मान, प्रेम आणि कुटुंबाची ऊब देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेला सदभावना वृद्धाश्रम हा केवळ निवारा नसून ज्येष्ठांच्या सन्मानपूर्ण आयुष्याचा आधार बनत आहे. समाजातील निराधार वृद्धांना या सेवांचा लाभ मिळावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading