पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीदिनी विशेष संगीतसंध्या
पुणे : ज्येष्ठ गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून श्रीकांत देशपांडे मित्रमंडळाच्या वतीने १२ जून रोजी संगीतसंध्या या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ४.३० वाजता होणार्या या मैफिलीत ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. मैफिलीसाठी रसिकांना मुक्त प्रवेश आहे.
मुंबई येथील वसंत पाटकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने होणार्या या मैफिलीत तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि भरत कामत (तबला), तसेच उपेंद्र सहस्रबुद्धे आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) हे कलाकार साथसंगत करतील. सूत्रसंचालन आनंद देशमुख करतील.
सवाई गंधर्वांचे नातू आणि पं. भीमसेनजी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. श्रीकांतजी यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या १२ जून या जयंतीदिनाचे औचित्य साधून श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ आणि शीला देशपांडे यांच्या वतीने दरवर्षी संगीतसंध्येचे आयोजन केले जाते.
श्रीकांतजी आणि ज्येष्ठ हार्मोनिअमवादक पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे विशेष स्नेहबंध होते. पं. जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे स्मरण ठेवत यंदाची संगीतसंध्या पं. जळगावकर यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येणार आहे. सुरेल गायक, कुशल संघटक, गुणग्राहक आणि अष्टावधानी आयोजक, सच्चा कार्यकर्ता..अशा पं. श्रीकांतजी यांच्या बहुविध पैलूंचे स्मरण या १४ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या विशेष मैफिलीच्या निमित्ताने केले जाते.
