भिलवडीशी असलेल्या नात्यामुळे गौरीचं पात्र मनापासून जवळचं वाटलं – ट्विंकल यादव
झी मराठीच्या नव्याने दाखल होणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’, या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव ही ‘गौरी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. कृष्णाईच्या तीन मुलींमधील मधली मुलगी असलेली गौरी जिद्दी, खंबीर आणि स्वप्नांसाठी लढणारी आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारी आणि कुटुंबासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाणारी गौरी आपल्या धाडसी स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे. ट्विंकलने आपल्या या नवीन प्रवास बद्दल गप्पा मारल्या. ” माझ्या व्यक्तिरेखेचं नाव गौरी आहे. कृष्णाईच्या तीन मुलींमधली मधली मुलगी म्हणजे गौरी. ती खूप स्ट्राँग, कॉन्फिडंट आणि खंबीर स्वभावाची आहे. जशी घरातील एक मजबूत ढाल संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करते, तशीच गौरी तिच्या आईची आणि बहिणींची ढाल आहे.आईने केलेले कष्ट, तिचा संघर्ष आणि आयुष्यभर दिलेला त्याग गौरीने लहानपणापासून जवळून पाहिला आहे. त्यामुळे तिचं आईवर प्रचंड प्रेम आहे आणि तिच्यासाठी ती कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करू शकते. मात्र, तिच्या वडिलांबद्दलच्या मनातील रागही तितकाच खोल आहे. या भावनांचा संघर्ष प्रेक्षकांना मालिकेत अनुभवायला मिळेल. गौरीचं मोठं स्वप्न म्हणजे कलेक्टर होण्याचं. तिची जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर ती हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसेल.मला गौरीचं पात्र पहिल्यापासूनच खूप रिलेट झालं. तिचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, निरागसपणा आणि कुटुंबाबद्दलची भावना या अनेक गोष्टी मला माझ्यासारख्याच वाटल्या. मी सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावची असल्यामुळे या पात्राशी आणि तिच्या पार्श्वभूमीशी एक वेगळं नातं जोडल्यासारखं वाटलं. त्यामुळे हे पात्र मला मनापासून आवडलं. ऑडिशन दिल्यानंतर साधारण दहा दिवसांत माझी निवड झाल्याचं कळलं आणि तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. गौरीचं स्वप्न कलेक्टर होण्याचं असल्यामुळे तिच्या भूमिकेसाठी मला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागत आहे. कायदे, महिला सुरक्षेशी संबंधित अधिकार, सामाजिक प्रश्न आणि प्रशासनाशी निगडित विषय समजून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे. स्वभावाच्या बाबतीत मी आणि गौरी अनेक बाबतीत सारख्या असल्यामुळे या पात्राशी जोडून घेणं मला सहज जमलं. मात्र, लेखकांनी ज्या पद्धतीने गौरीची व्यक्तिरेखा उभी केली आहे, त्यातील प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी विशेष मेहनत घेत आहे. मी जरी सांगलीच्या भिलवडी गावची असले तरी माझं लहानपण मुंबईत गेलं आहे. त्यामुळे गौरीची भाषा, तिची बोलण्याची पद्धत आणि ग्रामीण वातावरणाशी असलेलं तिचं नातं अधिक चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी मी त्यावरही काम करते आहे.
प्रोमोला मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी खूप खास आणि प्रेरणादायी आहे. लोक मला ‘गौरी’ म्हणून ओळखायला लागले आहेत, ही भावना शब्दांत सांगणं कठीण आहे. एकदा एका लोकेशनवर काही ताईंनी मला लांबून ‘गौरी’ म्हणून हाक मारली आणि माझ्यासोबत सेल्फी काढला. जाताना त्यांनी विचारलं, “गौरी, तुझ्या दोन बहिणी कुठे आहेत?” त्या क्षणी जाणवलं की स्क्रीनवर दिसणारं आमचं नातं प्रेक्षकांच्या मनापर्यंत किती सुंदररीत्या पोहोचलं आहे. मालिकेत जशा आम्ही तिघी बहिणी एकमेकींशी जोडलेल्या आहोत, तसंच ऑफस्क्रीनही आमचं खूप छान बॉन्डिंग आहे. खरं सांगायचं तर मी खूप नर्व्हस होते. सेटवर कसं वातावरण असेल, सीन कसा असेल, सगळ्यांशी कसं जुळेल अशा अनेक गोष्टी मनात सुरू होत्या. लोकेशनवर गेल्यानंतर समजलं की माझा पहिला सीन अॅक्शनशी संबंधित आहे. तो सीन करताना माझा पायही मुरगळला होता. थोडा त्रास झाला, पण सीन पूर्ण करण्याचा उत्साह तितकाच होता. त्या सगळ्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं आणि दिवसाच्या शेवटी मला खूप समाधान वाटलं. एकूणच पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
आमच्या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात होत आहे. सातारा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं अतिशय सुंदर ठिकाण आहे. आजूबाजूचं वातावरण, डोंगररांगा आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे काम करतानाही एक वेगळी ऊर्जा मिळते. फक्त उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे थोडा त्रास होतो. दिवसभर खूप उष्णता असते, पण संध्याकाळ होताच वातावरण थंडगार होतं. त्यामुळे दिवसभराचा थकवा कुठेतरी दूर झाल्यासारखं वाटतं. एकूणच साताऱ्यात काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. या टीममधील बरेच जण एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मी मात्र नवीन असल्यामुळे सुरुवातीला थोडी साशंक होते. पण इथल्या कोणालाही मला नवीन असल्याची जाणीव होऊ दिली नाही. प्रत्येक जण खूप मदत करतो आणि सतत काही ना काही नवीन शिकवतो. सेटवरचं वातावरण अगदी घरासारखं वाटतं. त्यामुळे काम करताना मोकळेपणाने वावरता येतं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे अनिकेत सरांसारखे दिग्दर्शक असल्यामुळे काम करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढतो. ते प्रत्येक गोष्ट अतिशय शांतपणे आणि स्पष्टपणे समजावून सांगतात. त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत आहे. यासाठी मी अनिकेत सर, सुबोध सर आणि संपूर्ण टीमची मनापासून आभारी आहे.
माझ्यासाठी ही मालिकेतील सर्वात आनंदाची गोष्ट होती. जेव्हा घरी कळलं की मला निवेदिता ताईंसोबत काम करायची संधी मिळणार आहे, तेव्हा घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव आणि थोडंसं टेन्शनही आलं होतं. इतक्या अनुभवी अभिनेत्रीसमोर आपण कसं काम करू, हे मनात सतत सुरू होतं. पण शूटिंग सुरू झाल्यानंतर ताईंनी मला खूप धीर दिला. जसं एखादी आई आपल्या मुलीला आधार देते, तसंच त्यांनी मला सतत मार्गदर्शन केलं. त्यामुळे माझा सगळा ताण आणि भीती हळूहळू दूर झाली. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं, एखादी चूक झाली तर समजावून सांगणं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणं या आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळत आहेत. प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की ही मालिका फक्त एक गोष्ट नाही, तर नात्यांची, स्वप्नांची, संघर्षांची आणि आशेची सुंदर कहाणी आहे. प्रत्येक पात्रामध्ये प्रेक्षकांना स्वतःचं किंवा त्यांच्या आसपासच्या व्यक्तींचं प्रतिबिंब कुठे ना कुठे नक्की दिसेल. ही मालिका नक्की पाहा आणि आम्हाला तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा असाच देत राहा.
आई-मुलींच्या नात्याची, संघर्षाची आणि स्वप्नांच्या प्रवासाची ही हृदयस्पर्शी कहाणी अनुभवण्यासाठी १५ जूनपासून दररोज संध्या. ७ वा. ‘कृष्णाईच्या लेकी’ पाहायला विसरू नका, सदैव तुमच्या झी मराठीवर.
