Tuesday, April 21, 2026
Latest NewsPUNE

जागतिक पातळीवर पाण्याचे संकट गंभीर त्यावर मार्ग काढण्याची गरज; जलपुरुष पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह 

पुणे : सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धाचे वातावरण आहे. त्यामुळे विदेशात लोक एक देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करीत आहेत. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.  दुसरीकडे जागतिक पातळीवर पाण्याचे संकट देखील गंभीर रूप धारण करत चालले आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून त्यावर मार्ग काढण्याचे मोठे आवाहन समोर असल्याचे प्रतिपादन रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते,  जलपुरुष पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रीन एक्स्पो २०२६ या प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली, या एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सिंह बोलत होते. कार्यक्रमाला रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिका, वनराई, जे. पी. श्रॉफ फाउंडेशन आणि टाटा ग्रीन बॅटरीज यांचे विशेष सहकार्य एक्स्पोला लाभले आहे.

नदी ही पृथ्वीवरील प्रमुख घटक आहे, तिच्याबरोबर छेडछाड करू नका. पाणी हे ब्रम्ह असून त्याचे महत्व फार मोठे आहे. सध्या जगाच्या अनेक भागांमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे परदेशात अनेक देशांमधील नागरिक दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करीत आहेत. जगण्याची धडपड, रोजगार मिळविण्यासाठी हे सुरु असले तरी जागतिक पातळीवर पाण्याचे संकट कठीण होत चालले आहे, त्यावर काम करण्याचे मोठे आव्हान आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी भूजल पातळी खालावत चालली असून ती देखील चिंतेची बाब आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करताना शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रपणे वापर होण्याची गरज आहे. आपण नीर, नारी आणि नदी या तीन गोष्टींना देखील खूप महत्व देण्याची गरज असल्याचे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.

पर्यावरण क्षेत्रात शाश्वत विकासाचे काम करत असताना त्यामध्ये आपल्या संवेदना असणे आवश्यक आहे. तसे झाले तर पर्यावरण विकासाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत असताना आपण डोळे आणि हृदयाने त्याच्याबरोबर जोडले जाण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला अभिप्रेत असणारा विकास करणे सहज साध्य होणार आहे. आपण हाती घेतलेले ग्रीन सोसायटी, ग्रीन स्कुल असे प्रकल्प त्यामधून यशस्वी होऊ शकतील. रोटरी क्लब चांगल्या पद्धतीने  काम करते. विशेष म्हणजे कोणत्याही नव्या कामामध्ये पुणे हे  देशात पहिल्या क्रमांकावर असते, असे डॉ. राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

पूर्वी रेल्वेने जाताना चंबळचे खोरे आले कि, रेल्वेमध्ये खिडक्या लावा, चंबळ आले आहे, असे ओरडून संगितले जायचे. सध्या इथे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या भागातील ६३३२ डाकूंनी हातातील बंदूक टाकून देत या भागातील नद्या जिंवत करण्याचे काम केले आहे, त्यामुळे इथे पाणी आले असून हे लोक उत्तम प्रकारे शेती करत असल्याची आठवण  डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितली.

पर्यावरण क्षेत्रात येत असणारे नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होत असल्याचे रोटरीचे संचालक संतोष मराठे यावेळी म्हणाले. रोटरी ग्रीन एक्स्पो हे शाश्वतता-केंद्रित, शाश्वतता या संकल्पनेवर आधारित व्यासपीठ असून यामध्ये एकाच छताखाली नागरिकांना त्यांच्या घरासाठी, कामाच्या ठिकाणी आणि समाजासाठी राबविण्यात येऊ शकणाऱ्या शाश्वतता विषयक उपायांची व उपक्रमांची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेण्यासोबतच त्यांचा सक्षम अवलंब कशा पद्धतीने करायचा यासंदर्भात देखील मार्गदर्शन मिळू शकेल असेही मराठे यांनी नमूद केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनमानाला प्रोत्साहन देणे हे या एक्स्पोचे मुख्य उद्देश असल्याचेही रोटरीचे डिस्ट्रिक डायरेक्टर केशव ताम्हनकर यांनी अधोरेखित केले.

२०२६ च्या या तिसऱ्या वर्षीच्या एक्स्पोमध्ये ७५ हून अधिक स्टॉल्स असणार असून यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण्याचे उपाय, कचरा व पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, कंपोस्टिंग उपाय, पुनर्वापर केलेली उत्पादने, सेंद्रिय अन्न, हरित स्वच्छता उपाय, वनस्पती व  पर्यावरणपूरक जीवनशैलीशी संबंधित उत्पादने यांवरील नाविन्यपूर्ण व व्यावहारिक उपाय आदी विषयांशी संबंधित स्टॉल्स नागरिकांना पहायला मिळतील.

सदर प्रदर्शनाव्यतिरिक्त दोन दिवसांच्या या कार्यक्रमात तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पॅनेल चर्चा, मुख्य सत्रे, प्रत्यक्ष कार्यशाळा, थेट प्रात्यक्षिके देखील आयोजित करण्यात येणार आहेत. एक्स्पोमध्ये शाश्वतता व्यावसायिक, उद्योग तज्ज्ञ यांसोबतच परिसर, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, जीवितनदी, आजजीबीसी, प्रेरणा एनर्जि, एकोसान सर्विसेस फाऊंडेशन आणि इकोलॉजिकल सोसायटी या संस्थांचा देखील महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे. आजच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरती नवाथे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading