संकटाचे संधीमध्ये रूपांतर करणे हीच यशाची गुरुकिल्ली – नरेंद्र गोयल
श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्सचा ८वा स्थापना दिन उत्साहात साजरा .
पुणे : प्रतिनिधी
संकटाच्या काळातच व्यक्तीची खरी क्षमता तपासली जाते. संकटाचे संधीमध्ये रूपांतर करणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन देशातील जनरेटर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स चे संचालक नरेंद्र गोयल यांनी केले.
ते कंपनीच्या आठव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महिंद्रा कंपनीचे सीनियर जनरल मॅनेजर अंकुर श्रीवास्तव, जनरल मॅनेजर (प्रॉडक्ट मॅनेजमेंट) अमित देसाई, महेश सरवणकर, श्याम ग्लोबलचे ऑपरेशन्स हेड गुलशन खजुरिया, संचालिका रुचि गोयल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच राज्यभरातील महिंद्रा जेनसेटचे प्रमुख वितरक, कंपनीचे कर्मचारी व अधिकारी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंपनीच्या आठ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र, आज श्याम ग्लोबल टेक्नोवेंचर्स ने देशातील प्रमुख पाच जनरेटर निर्मिती कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. जनरेटर निर्मितीसोबतच कंपनी विविध क्षेत्रांत विस्तार करत आहे. पुण्यासारख्या शहरांमधील पार्किंग समस्येचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित १६ मजली स्वयंचलित पार्किंग प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
याशिवाय, अमेरिकेतील पीएर रोबोटिक्स कंपनीसाठी रोबोट तयार करून त्यांची निर्यात केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ सात कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या कंपनीने अवघ्या आठ वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली असून सध्या ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील तीन ते पाच वर्षांत तिपटीने व्यवसायवाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या संचालिका रुचि गोयल यांनी सांगितले की, “कर्मचारी हेच कंपनीचे खरे बळ आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक नात्यांमध्ये संतुलन राखण्यावर आम्ही विशेष भर देतो. सर्व कर्मचारी श्याम ग्लोबल कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कंपनीच्या यशाचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला.
