Wednesday, April 22, 2026
Latest NewsPUNE

कवी संजय गायकवाड यांच्या काव्य संग्रहांचे आईच्या हस्ते प्रकाशन

 

पिंपरी, प्रतिनिधी :
कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सूर्य गोंदला’ आणि ‘सूर्यांधकारात माणूस’ द्वितीय आवृत्ती या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसेकर, रजत प्रकाशनचे प्रकाशक अशोक कुमठेकर, नगरसेविका तृप्ती कांबळे, नगरसेविका दीप्ती कांबळे, रोहिणीताई गायकवाड, अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, मुखपृष्ठकार अनिल जोशी, दिलीप कुमठेकर, अभियंता विजय मानकर, चंद्रकांत चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. विश्वास वसेकर म्हणाले, की गायकवाड हे मराठीतील प्रतिथयश कवी आहेत. कवितेत अनुभवाचे संश्लेषण असते. बाकी प्रकारात अनुभवांचे विश्लेषण असते. गायकवाड यांची कविता श्रेष्ठ दर्जाची कविता आहे. ती चिरकाल टिकणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी कविता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू गायकवाड यांच्यात आहेत. कवितेत आईचे मोठे स्थान आहे. आईच्या हस्ते प्रकाशन ही मोठी गोष्ट आहे. आईला कवितेचा विषय बनविणे साधी गोष्ट नाही.
विमलताई म्हणाल्या, माझी मुलं हीच माझी बँक आहे. मुलं फुलासारखी जपत आहेत. मुलगा कवी झाला ही मोठी गोष्ट आहे.
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ म्हणाले, लेखन ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. संजय गायकवाड यांना जी आई भेटली ती सर्वांना भेटली पाहिजे. त्यांच्या कवितेत दुर्बोधता, क्लिष्टता कुठेही दिसत नाही. चिंतनशिलता, सूक्ष्मता दिसते. गिरणी कामगाराचा मुलगा लिहतो ही मोठी गोष्ट आहे. कवितेत व्यक्तीपूजन नाही, या अर्थाने कवी मोठा वाटतो. आईचे सामर्थ्य खूप मोठे असते. आईची विचारधारा संजय गायकवाड यांच्या काव्यात उतरले आहेत. मातृमहती हरविलेल्या जगात हे महत्वाचे आहे.
संजय गायकवाड म्हणाले, की आई – वडिलांनी अंधारातून प्रकाशाकडे नेले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशाकडून प्रकाशाकडे नेले. माणसाच्या आयुष्यात अंधार आल्यावर तो उभा राहू शकत नाही. ज्ञानाच्या जोरावर अंधारावर मात करू शकतो. माझ्या ज्ञानाचे सोने पुस्तक रूपाने आईच्या चरणी ठेवले. चांगल्या गोष्टी लिहायला शिकले पाहिजे. आई वडिलांना जपा.
मुखपृष्ठकार जोशी म्हणाले, कठीण परिस्थितीवर मात करून माणूस पुढे जातो, हे मुखपृष्ठातून दिसते. प्रकाशक कुमठेकर यांनी पुस्तक प्रकाशनामागची संकल्पना स्पष्ट केली.
प्रास्ताविक आशिष गायकवाड यांनी केले. त्यांनी सांगितले, की कवी गायकवाड यांनी खडतर परिस्थितीवर मात करीत यशस्वी कवीपर्यंतचा प्रवास केला आहे.
सूत्रसंचालन मंजिरी तिक्का यांनी, तर आभार मीनल देशपांडे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading