डॉ. सूरज व जानकी म्हस्के यांचे मनोगत
म्हस्के दाम्पत्याला डॉ. विजय बंग सोशल वेल्थ क्रिएटर अवार्ड २०२५ प्रदान
पुणे : जिथे सर्वाधिक गरज आहे तिथे सेवा द्यायची, या तत्त्वाचा अंगीकार करून दुर्गम ग्रामीण गावात आरोग्यसेवेचे कार्य सुरू केले. मात्र, या सेवाकार्याचे श्रेय आमच्या टीमचे आहे. आम्ही दोघे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून सेवा देतो, पण आमच्यासोबत सर्वतोपरी सहकार्य करणारी, सतत आमच्यासोबत असणारी समविचारी टीम आणि सोबत असणारे गावकरी आहेत. त्यामुळेच आरोग्यसेवा देणे शक्य होत आहे. या पुरस्काराचा सर्व टीमच्या वतीने स्वीकार करतो, असे मनोगत डॉ. सूरज म्हस्के यांनी व्यक्त केले.
वसंत बंग सोशल वेल्थ फाऊंडेशन आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित कार्यक्रमात डॉ. विजय बंग सोशल वेल्थ क्रिएटर अवार्ड २०२५ चा स्वीकार करताना डॉ. म्हस्के बोलत होते.
‘सोबत फाऊंडेशन’च्या ‘जाणीव रुग्णालया’च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील गेवरा भूज या गावात डॉ. म्हस्के आणि त्यांच्या पत्नी डॉ. जानकी गुरपुंडे यांनी उभारलेल्या आरोग्य सेवेचा गौरव उभयतांना डॉ. विजय बंग सोशल वेल्थ क्रिएटर अवार्ड २०२५ प्रदान करून करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व एकलव्य न्यासाच्या संस्थापक रेणू गावस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी किर्लोस्कर ब्रदर्सच्या मनुष्यबळ विकास आणि कम्यूनिकेश विभागाच्या उपाध्यक्षा मोहिनी कुडतरकर, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षा शिल्पा पाठक, पुरस्काराचे प्रवर्तक डॉ. वसंत बंग, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसचे संचालक प्रो. महेश ठाकूर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार प्रदानानंतर ग्रामीण आरोग्य सेवांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या चर्चेतही हे मान्यवर
सहभागी झाले.
मनोगतातून डॉ. सूरज आणि डॉ. जानकी यांनी त्यांचा वैद्यकीय सेवेचा प्रवास, संघर्ष आणि आव्हानांचीही माहिती दिली. “जनसेवेचा वारसा घरातूनच मिळाला. आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. महात्मा गांधींचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे लहानपणापासून सामाजिक कार्याचे संस्कार होतेच. वैद्यकीय शाखा निवडल्यापासूनच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात काम करायचे, हे ठरवले होते. सुदैवाने डॉ. जानकीच्या रूपाने मला समविचारी सहधर्मचारिणी लाभली आणि वैद्यकीय पदवी, त्यानंतर दंतरोगचिकित्सेत उच्चशिक्षण पूर्ण करून, आम्ही एकविचाराने चंद्रपूर जिल्ह्यातील गेवरा भूज गावात आरोग्यसेवेला सुरवात केली. त्यासाठी आधी ‘सोबत फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि फाऊंडेशनमार्फत ‘जाणीव रुग्णालय’ उभारले. आजवर ५० हजार रुग्णांना आरोग्यसेवा दिली असून, त्यात ३ हजारपेक्षा अधिक तातडीच्या (इमर्जन्सी) आरोग्यसेवांचा समावेश आहे. सुदैवाने आम्हाला साथ देणारी समर्पित वृत्तीची, सेवाभावी अशी टीम सोबत आहे. त्यामुळे आरोग्यसेवा देणे शक्य होत आहे“, असे डॉ. सूरज म्हस्के म्हणाले.
डॉ. जानकी म्हणाल्या, “माझ्याही घरात लोकसेवेची परंपरा होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेताना आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना व्हावा असे मनात होतेच. प्रत्यक्ष आरोग्यसेवांच्या जोडीने आम्ही विविध आरोग्यविषयक शिबिरे, कार्यशाळा, साथरोग, कर्करोग, नेत्ररोग, दंतरोगविषयक जाणीवजागृतीची अभियाने सातत्याने राबवतो. या सेवांचा आणि जाणीवजागृतीचा उपयोग या परिसरातील आदीवासी आणि गरजू ग्रामीण नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे, याचे समाधान वाटते.“
रेणुताई गावसकर म्हणाल्या, “डॉ. सूरज आणि डॉ. जानकी या दांपत्याने आपल्या वैद्यकीय सेवांचा परीघ विस्तारून सामाजिक संपत्तीची निर्मिती (सोशल वेल्थ) केली आहे. अशा सेवेच्य माध्यमातून समाजातील ‘नाही रे’ गटांना आरोग्यविषय़क सेवांच्या परिपूर्तीचा दिलासा हे दोघे देत आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे गुण आहेत आणि कृतज्ञता हे फार मोठे मूल्य आहे. समाजातील वंचित, शोषित आणि अभावग्रस्त घटकांसाठी डॉ. दांपत्याचे कार्य अशा कृतज्ञतेचे रोल मॉडेल आहे.“ सागर धारिया यांनी सोशल हेल्थ आणि सोशल कॅपिटल या संकल्पनांची माहिती दिली.
मोहिनी कुडतरकर यांनी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलिटी)च्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांना पाठबळ देण्याचे कार्य घडत असल्याचा उल्लेख केला. डॉ. वसंत बंग यांनी पुरस्कारामागील संकल्पनेचे स्पष्टीकरण केले. प्रो. शर्मिला रामटेके यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. आरती बंग यांनी आभार मानले. वैभव शेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Like this:
Like Loading...
Related