ऑनलाइन गेमिंग बाबत राज्य सरकार उचलणार कठोर पावले
मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत ग्वाही
मुंबई प्रतिनिधी
ऑनलाइन गेम्स तयार करणारे लोक विकृत असून त्यांच्यामुळे अल्पवयीन मुले आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग बाबत राज्य सरकार लवकरच कठोर पावले उचलेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अशी शेलार यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.
ऑनलाइन गेमिंगमुळे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुले आत्महत्या करत आहेत. ऑनलाइन गेमिंग ही एक गंभीर समस्या बनली आहे. त्यात सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना शेलार यांनी ऑनलाइन गेम्स वर कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचे सूचित केले.
ऑनलाइन गेमिंगच्या समस्येकडे सरकार गांभीर्याने बघत आहे. या समस्येचे स्वरूप जटील व गुंतागुंतीचे असल्यामुळे त्या बाबत निर्णय घेण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनापर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. याशिवाय पालक, शिक्षक आणि तज्ञ यांची मतेह विचारात घेतली जाणार आहेत. तसेच 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी ऑनलाइन गेमिंग च्या जाळ्यात अडकू नये, यासाठी उपाययोजना करण्याची चर्चा सुरू आहे. याची व्याप्ती वाढवण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले.
