फोनपेचा पुणे व पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांशी संयुक्त उपक्रम
पुणे : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी फोनपेने पिंपरी-चिंचवड आणि पुणे सायबर क्राईम पोलिसांसाठी विशेष ‘सायबर क्राईम ट्रेनिंग वर्कशॉप’ आयोजित केले. या उपक्रमाची नुकतीच यशस्वी सांगता झाली असून, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS), पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्यासह सायबर विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान व्यवहारांचा प्रवाह, एस्क्रो खात्यांमधील निधीची हालचाल, विविध खात्यांतून फिरवले जाणारे पैसे आणि त्यांचा डिजिटल मागोवा घेण्याच्या तांत्रिक पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट ट्रेडिंग ॲप्स आणि गुंतवणूक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले असून, सायबर गुन्हेगार ‘सोशल इंजिनीअरिंग’, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हा घडल्यानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये संशयित खाती तात्काळ गोठवण्यासाठी फोनपेच्या विशेष पोर्टलचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.
फोनपेचे ट्रस्ट अँड सेफ्टी विभाग प्रमुख सत्यजित कुमार म्हणाले, “भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीचे यश नागरिकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. प्रत्येक व्यवहार सुलभ आणि सुरक्षित असावा, ही आमची भूमिका आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांसोबतचे सहकार्य अधिक मजबूत डिजिटल सुरक्षा व्यवस्था उभारण्यास मदत करेल.”
सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे म्हणाले, “डिजिटल व्यवहारांचा वेग वाढत असताना सायबर सुरक्षाही तितकीच मजबूत असणे गरजेचे आहे. फोनपेच्या सहकार्यामुळे निधीचा प्रवाह आणि व्यवहारांची साखळी समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे तपास अधिक जलद आणि प्रभावी होईल.”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, “सायबर गुन्ह्यांमध्ये पहिल्या तासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. फोनपेच्या तांत्रिक सहकार्यामुळे संशयित खाती तत्काळ गोठवणे आणि पीडितांना मदत करणे अधिक सुलभ होईल. या प्रशिक्षणामुळे आमच्या तपास क्षमतेत निश्चितच वाढ झाली आहे.”
या संयुक्त उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांचे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
