Monday, September 28, 2026
Latest NewsPUNE

‘हाती घ्याल ते तडीस न्या’ हे ब्रीद प्रत्येकाने अंगिकारावे – लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त)

पुणे : सैनिक अत्यंत धोकादायक मोहिमेवर निर्धास्तपणे पुढे जातो, कारण त्याचा अधिकारी स्वतः पुढाकार घेत त्याच्या सुरक्षेसाठी पुढे उभा असतो. असा आदर्श नेतृत्वगुण लाभलेले अधिकारी म्हणजे कॅप्टन सुशांत गोडबोले. हाती घ्याल ते तडीस न्या हे त्यांचे ब्रीद होते. त्यांचे हे ब्रीद प्रत्येक नागरिकाने अंगिकारले तर समाजातील अनेक समस्या दूर होतील, असे मत लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनच्यावतीने कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लायन फत्तेचंद रांका, शिरीष देशमुख, सतिश राजहंस, सुजय गोडबोले, स्नेहल गोडबोले, सुवर्णा (गीता) गोडबोले, पुखराज संचेती, विलास मुळे, सत्यजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

वीरपत्नी स्मिता पालेकर, वैशाली धनावडे, रेखा वाघ, उज्वला निकम, हसीना हलदर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात गायक मकरंद पाटणकर, रामेश्वरी वैशंपायन, गफार मोमीन, अर्चना पोतनीस यांनी गीत गायनातून कॅप्टन सुशांत गोडबोले व शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. निवेदन महेश गायकवाड यांनी केले.

फत्तेचंद रांका म्हणाले, आज सीमेवर सर्व जवान केवळ देश रक्षणाचा एकच ध्यास घेऊन लढत आहेत. परंतु आपण देशात राहून सीमावाद, प्रांतवाद आणि जातीवादात अडकलेलो आहोत. ते एक राहून देशाचे रक्षण करत आहेत, तर आपण का देशाचे तुकडे करीत आहोत? आपण सर्वांनी एक होऊन जवानांच्या पाठीशी उभे राहिलो, तर जगातील कोणतीही ताकद भारताला हरवू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

गीता गोडबोले म्हणाल्या, इ.स. २००३ साली वयाच्या २५ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. कॅप्टन सुशांत यांना गाण्यांची आवड असल्याने दरवर्षी त्यांना सांगीतिक कार्यक्रमातून आदरांजली देण्यात येते. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम देखील आयोजित केले जातात, असेही त्यांनी सांगितले. सत्यजित शिंदे यांनी फौंडेशन बद्दलची माहिती देऊन आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading