‘पीडीएफए लेजेंड्स करंडक’ फुटबॉल स्पर्धेत जोगा पुणे संघाला विजेतेपद !!
पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटने (पीडीएफए) तर्फे आयोजित पुण्यातील आजी-माजी फुटबॉल प्रशिक्षकांचा समावेश असलेल्या ‘पीडीएफए लेजेंड्स करंडक’ प्रौढ गटाच्या (४० वर्षावरील) ८-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जोगा पुणे संघाने अकात्सुकी संघावर टायब्रेकमध्ये ५-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
पाषाण येथील एनसीएल मैदानावर या एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४० वर्षावरील माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक यांना एकत्र आणून या फुटबॉल दिग्गजांना पुन्हा खेळताना पहाणे, हा या एकदिवसीय स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेसाठी मनीष सुरेंद्र आनंद यांनी पाठींबा दिला होता, ज्यांच्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत घाना, अल्फा लेजेंड्स, पॅसिफिक एफसी, अकात्सुकी, पुणे व्हेटरन्स्, ओल्ड राईस, जोगा आणि खडकी लेजेंड्स या संघांनी भाग घेतला होता.
गटसाखळी पद्धतीने स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले. उपांत्य फेरीमध्ये जोगा, अकात्सुकी, खडकी लेजेंड्स आणि पॅसिफिक एफसी संघांनी धडक मारली. जोगा संघाने खडकी लेजेंड्स संघाचा टायब्रेकमध्ये ४-३ असा तर, अकात्सुकी संघाने पॅसिफिक एफसी संघाचा टायब्रेकमध्ये ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जोगा संघाने अकात्सुकी संघावर टायब्रेकमध्ये ५-४ असा पराभव करून विजयश्री मिळवली. जोगा संघाच्या केनेथ फर्नांडिस याने निर्णायक पेनल्टीचे गोलामध्ये रूपांतर करून संघाचा विजय निश्चित केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, फुटबॉल क्रीडाप्रकार मजबूत करण्यासाठी आणि या खेळाला चालना देण्यासाठी अशाप्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी संघटना उत्सुक आहे. ज्यामुळे वरिष्ठ आणि उदयोन्मुख असे दोन्ही वयोगटातील फुटबॉलपटू खेळाच्या सकारात्मक भावनेसह उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतील. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
