Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

भारत -पाक सीमेवरील जम्मू- काश्मीरच्या पुंछ मध्ये उभा राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, शौर्य, कीर्ती जगमान्य आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक भारतीय जवानांसाठी स्फूर्ती आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने ९ मराठा रेजिमेंट पुंछ जम्मू कश्मीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला आम्ही पुणेकर चे विश्वस्त अखिल झांजले, विपुल कांबळे, अँड मिलिंद पवार, अभयराज शिरोळे, श्याम दौडकर, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आदी उपस्थित होते.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ११ किल्ले आहेत. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि तामिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांची माती आणि पाणी नेण्यात येणार आहे.

आम्ही पुणेकर चे विश्वस्त संदीप मते म्हणाले, गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये शिव स्वराज्य यात्रेने सुरुवात होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. त्यानंतर दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त रथयात्रेचे स्वागत सावरकरांनी रचलेल्या शिवरायांच्या आरतीचे गायन करून होणार आहे. त्यानंतर बडोदा, अहमदाबाद येथील राजभवन, उदयपूर, जयपूर येथील राजभवन, दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन, पठाणकोट, जम्मू राजभवन अशा विविध ठिकाणी स्वागत व पूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष पुंच्छ येथे या स्मारकाचे उद्घाटन होईल.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित श्री शिवशंभू विचार मंच यांचे याकरिता विशेष सहकार्य मिळाले आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल आणि विराज खटावकर यांनी केली आहे. खटावकर यांची तिसरी पिढी शिल्पाचे काम करीत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने उभारण्यात आला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जपानची राजधानी टोकियो येथे मार्च महिन्यात गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा देणारे स्मारक भारतीय जवानांसाठी अभिमानाने उभे राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading