Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आठ हजार 300 नव्या बसेस

 

मुंबई :  प्रवाशांना अधिक कार्यक्षम सेवा देण्याबरोबरच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महामंडळाने नवा मास्टर प्लॅन आखला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली.

या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8 हजार दोनशे नव्या बसेस दाखल होणार आहेत. दोन शहरांमध्ये सेवा देण्यासाठी राजमाता जिजाऊ सेवा सुरू करण्यात येणार असून खाजगी प्रवासी वाहतूक व्यावसायिकांशी स्पर्धा करण्यासाठी सुविधायुक्त व आरामदायक बसेसचा समावेशही ताफ्यात करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी साध्या बसेस आणि आदिवासी दुर्गम भागांसाठी मिनी बसेसची खरेदीही महामंडळाकडून केली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुक्कामी गाड्यांची संख्या वाढवणे आणि शिक्षणासाठी खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करणे यावर ग्रामीण भागातील सेवेचा भर राहणार आहे.

एसटी महामंडळाला सध्या मोठ्या आर्थिक तुटीला सामोरे जावं लागत आहे. मात्र, बसेसची संख्या वाढली की प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रवाशांची संख्या वाढली की आर्थिक आवक वाढेल, या सूत्राला अनुसरून एसटी महामंडळाचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे.

कोरोना महामारी काळापूर्वी एसटीच्या चाफ्यात 19 हजार बसेस होत्या. मात्र, कालबाह्य झालेल्या बसेसची मोठी संख्या आणि नवीन खरेदीचा अभाव यामुळे प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या साडेबारा हजाराच्या आसपास आहे. एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे.

मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. नव्या आराखड्यानुसार बसेसची संख्या वाढवल्यास प्रवाशांना उत्तम सेवा देण्याबरोबरच आर्थिक निर्भरता कमी करण्यासाठी तो प्रभावी ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

प्रवासी आणि महामंडळाच आस्थापनांच्या सुरक्षेचा विचारही नव्या आराखड्यात करण्यात आला आहे. त्यानुसार 111 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांतर्गत एसटी स्थानके, आगार, विभागीय कार्यालय आणि कार्यशाळा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत राज्यात 633 ठिकाणी 7 हजार 35 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ते मुंबईतील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेत प्रभावी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading