मंत्रालयातील धाड प्रकरणी सुनेत्रा पवार आक्रमक; झिरवाळ यांना दिली कडक शब्दात समज
मुंबई प्रतिनिधी
थेट मंत्रालयात लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लिपिकाला अटक प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्रमक भूमिका घेऊन मंत्री नरहरी झिरवाळ यांना धारेवर धरले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील झिरवाळ यांची कानउघाडणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली देवगिरी बंगल्यावर काल पार पडली. मंत्रालयातील धाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्यासह आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदार यांना पक्षांतर्गत शिस्त पाळण्याबरोबरच पक्षाची प्रतिमा राखण्याबाबत तंबी दिली.
स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याबाबत नेहमी कटाक्ष ठेवा. आपल्या कारभारामुळे प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याची काटेकोरपणे काळजी घ्या, असे सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत सुनावले.
विलीनीकरणाबाबत चर्चा नाही
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव अथवा विचार सध्या पक्षासमोर नसल्याचे त्यांनी सांगितले.
