अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा?
थकीत कर्जदारांची माहिती पाठवण्याचे सरकारचे बँकांना आदेश
मुंबई : राज्यातील सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सात बारा कोरा करून मिळण्याची शक्यता आहे.
मागील काही काळापासून अतिवृष्टी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहेत. खते, बियाणांची महागाई आणि अस्थिर बाजारभावाने त्यात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी मागणी विशेषतः विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यापूर्वी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येत कर्जमाफीसाठी आंदोलनही केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ते प्रत्यक्षात येण्याची चिन्ह आहेत.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
