राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना
पुणे : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या प्रभावामुळे भारतातील ३० टक्के जमिनी नापिक झाल्या आहेत, देशात दरवर्षी पंधरा लाख पेक्षा अधिक नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी अथवा पर्यावरण संतुलनासाठी नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारणी करणे काळजी गरज आहे. यासाठी संत गजानन महाराज प्रगट दिनाचे निमित्त साधून, पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाच्या माध्यमातून, सदगुरु दुंडा महाराज (देगलूरकर) मठ पंढरपूर येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन ची स्थापना करण्यात आली.
या वेळी कृषी भूषण तात्या मगर, राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे मुख्य विजय वरुडकर, संघ जिल्हा कार्यवाह प्रताप टपले, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संचालक आचार्य ज्ञानेश्वर शिंदे, खुशालचंद मोरे, सुरेश घाडगे, पांडुरंग बरळ, दत्तात्रय हरळे, गजानन मगर, नानासाहेब जाधव, हनमंत जाधव, कलप्पा भतगुणकी, उदय मुळे, विठ्ठल क्षीरसागर, अरुण जगताप, प्रताप देशमुख, शुभम अडबाल, डॉ बापु तारसे इतर शेतकरी उपस्थित होते.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह गेली १२ वर्षा पेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज पर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील ३००० पेक्षा अधिक सामाजिक संस्था, १००० पेक्षा अधिक गोशाळा गोपालक, ५००० पेक्षा अधिक कीर्तनकार यांची बांधणी करण्यात आली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ५००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले होते.
ग्रामीण स्वावलंबन विषयी काम करतांना गट शेतीतून कृषी उद्योग विकसित करणे हा हेतू ठेऊन राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन कार्यरत असणार आहे. भविष्यात उद्योगांचे दाईत्व आलेल्या सीएसआर प्रकल्पांची जोडणी ग्राम समस्या निवारणासाठी व नैसर्गिक शेती प्रकल्प गतिशील करण्यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह प्रयत्नशील असेल, असे विजय वरुडकर यांनी सांगितले.
प्रांत, जिल्हा व तालुका स्तरावर संयोजक समिती स्थापन करून गाव, गोशाळा, शेतकरी गट अथवा बचत गट यांना केंद्र करून नैसर्गिक शेती प्रकल्पांची बांधणी व प्रशिक्षण सत्र आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले.
कृषी भूषण तात्या मगर यांनी सांगितले की, रासायनिक खत बी बियाणांवर दर वर्षी दीड लाख करोड पेक्षा अधिक रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देत आहे. त्या एवजी शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनासाठी, नैसर्गिक शेतीसाठी आर्थिक अनुदान सरकार नी द्यावे. ज्या मुळे खऱ्या अर्थाने शेती विकास होईल.
ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की गेली एक वर्ष आम्ही या फेडरेशनच्या बांधणी व कामकाज विषयी विचार विनिमय करत आहोत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम आचार्य देवव्रत हे सच्चे गोभक्त व नैसर्गिक शेती चे प्रवर्तक आहेत. आम्ही लवकरच माननीय राज्यपाल यांची भेट घेऊन नैसर्गिक शेती प्रकल्पांची पुढील वाटचाल आपणास कळवू.
