Friday, April 24, 2026
Latest NewsSports

Brahmin Cricket League : चंबळ रेबेल्स्‌‍ संघाला विजेतेपद !!

तिसरी ‌‘ब्राह्मण क्रिकेट लीग‌’ (बीसीएल) २०२६ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!


पुणे :  एजीए स्पोर्ट्‌‍स मॅनेजमेंट यांच्यावतीने आयोजित तिसऱ्या ‌‘ब्राह्मण क्रिकेट लीग‌’  (बीसीएल) २०२६ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत अश्विन श्रीखंडेची अचूक गोलंदाजी आणि नीरज आठवले याच्या ८४ धावांच्या जोरावर चंबळ रेबेल्स्‌‍ संघाने मांडोवी मंडळ संघाचा ३ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूलच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून चंबळ रेबेल्स्‌‍ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मांडोवी मंडळ संघाने २० षटकात ९ गडी गमावून २०२ धावांचे लक्ष्य उभे केले. संघाचा डाव उभा करताना अद्वय सिधये याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि १३ षटकारांसह १०२ धावांची खेळी साकारली. आपली स्फोटक खेळी साकारताना अद्वय याने १७ व्या षटकामध्ये चंबळ संघाच्या नचिकेत कुलकर्णी याच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार खेचले. त्यानंतर १९ व्या षटकामध्ये अद्वय याने नीरज आठवले याच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार खेचून संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. चंबळ संघाच्या अश्विन श्रीखंडे याने २१ धावांत चार गडी तर, अमोल बेहेरे याने दोन गडी बाद केले. हे लक्ष्य चंबळ रेबेल्स्‌‍ संघाने १९.४ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. नीरज आठवले याने ३७ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८४ धावांची खेळी साकारली. १६ व्या षटकात नीरज आठवले ने श्रीपाद भागवत ला सलग पाच चौकार लगावले. मंगेश साठे (४१ धावा), तनय पुसाळकर (२८ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२२ धावा) यांनीही धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला आणि विजेतपदावर आपले नाव कोरले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय क्रिकेटपटू जतिन परांजपे आणि मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते विजय पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपरजेन कंपनीचे कुणाल मराठे, पे लाईन कंपनीचे आदित्य बेहेरे, रानडे रिअलटर्स चे केदार रानडे, रामरीन  चे केदार लागू, फोर फाऊंटन स्पाच्या रत्ना कुलकर्णी तसेच सुनिल दाणी,  राजेंद्र मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या चंबळ रेबेल्स्‌‍ संघाला विजेतेपद करंडक आणि मेडल्स, मांडोवी मंडळ संघाला करंडक देण्यात आले.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
मांडोवी मंडळः २० षटकात ९ गडी बाद २०२ धावा ( अद्वय सिधये १०२ (३१, ३ चौकार, १३ षटकार), श्रीपाद भागवत २१, जीतेंद्र शेंडे १९, अश्विन श्रीखंडे ४-२१, अमोल बेहेरे २-२१) पराभूत वि. चंबळ रेबेल्स्‌ः १९.४ षटकात ७ गडी बाद २०३ धावा (नीरज आठवले ८४ (३७, १३ चौकार, ३ षटकार), मंगेश साठे ४१, तनय पुसाळकर २८, नचिकेत कुलकर्णी २२, श्रीपाद भागवत ३-३५, अनिरूध्द अंबुलगेकर ३-५२); सामनावीरः नीरज आठवले / अश्विन श्रीखंडे यांना विभागून.

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः अद्वय सिधये (२८५ धावा; ९ विकेट; मांडोवी मंडळ);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः नीरज आठवले (३१६ धावा; चंबळ रेबेल्स्‌‍);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः निखील नासेरी (१३ विकेट; कृष्णा लिजेंड्स);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading