Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

महिला स्वबळावर उभ्या राहिल्या तर कुटुंबाचे सक्षमीकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर

पुणे : स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर ती केवळ स्वतःचा विकासच नाही. तर संपूर्ण कुटुंबाचे सक्षमीकरण करते. उद्योग व्यवसायात महिला आल्यास स्वयंरोजगारातून त्या स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वयंरोजगार स्वतः पुरता मर्यादित न ठेवता, त्यातून पुढचे पाऊल टाकत महिलांनी उद्योजकतेकडे वळायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील १२५ महिलांना मोफत शिलाई मशिन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले, जागतिक वित्त क्षेत्रातील अग्रणी मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ञ सीए देवेंद्र मिश्रा, निरंजन सेवाभावी संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक, कार्याध्यक्ष अजय झंवर, भारत वेदपाठक, अहिल्यानगरचे संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा आदी उपस्थित होते.

सीए देवेंद्र मिश्रा म्हणाले, पूर्वी महिला साक्षरतेची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असे. आता आपण महिला सक्षमीकरणाची चर्चा करीत असतो. त्याकरिता महिलांमध्ये विविध प्रकारची कौशल्ये असणे आवश्यक आहे. या कौशल्याच्या आधारे महिलांचे सशक्तीकरण होउ शकते. महिला स्वतःच्या कुटुंबासोबत, गाव, देश देखील उभा करू शकते. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरणाचे उत्तम कार्य होत असून यापुढे आम्ही देखील त्यांच्यासोबत कायम असू.

योगिता भोसले म्हणाल्या, जेव्हा कोणत्याही महिलेला वेगळी ओळख मिळते, तेव्हा ती केवळ महिलेपुरती रहात नाही, तर ती ओळख संपूर्ण कुटुंबाला मिळते. त्यामुळे महिला कर्तृत्ववान झाल्या तर त्या स्वतः खूप मोठ्या होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सीए दुर्गेश चांडक म्हणाले, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगार व स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १२५ महिलांना शिलाई मशीन मोटार सह देण्यात आले. यामध्ये पुण्यासह बीड आणि अहिल्यानगर येथील महिलांचा समावेश आहे. महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रात देखील २५ हजार हुन अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. भूषण मानधने यांनी सूत्रसंचालन केले. अजय झंवर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading