Monday, September 28, 2026
Latest NewsPUNE

समर्पण आणि सेवा यातून व्यवसाय वृद्धी – डॉ.श्रीपाल सबनीस

 

पुणे : कोणतीही मिसळ चवदार असते. मात्र ती देणाऱ्यामध्ये सेवाभाव, आत्मीयता आणि प्रेम असेल, तर त्याची चव अधिकच वेगळी लागते. बेडेकर मिसळ यांचा व्यवसाय टी हाऊसपासून ते चार पिढयांपर्यंत पोहोचला आहे. आज आधुनिकता आणि परंपरा ही बेडेकर कुटुंबाने जपली असून समर्पण आणि सेवा यातून व्यवसाय वृद्धी होते हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

डॉ.न.म. जोशी व कुटुंबीय पुरस्कृत बल्लवाचार्य कै.म.वा. जोशी स्मृती गौरव अन्नब्रह्म पुरस्कार २०२५-२६ हा नारायण पेठेतील बेडेकर टी स्टॉल म्हणजेच बेडेकर मिसळ यांना नारायण पेठ मुंजोबाच्या बोळातील त्यांच्या वास्तूत झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आयोजक डॉ.न.म. जोशी, मुरलीधर भोजनालयाचे गोपाळ तिवारी यांसह बेडेकर कुटुंबीय उपस्थित होते. बेडेकर मिसळ चे अनिल आणि आल्हाद बेडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, शाल, रुपये २ हजार ५०० असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा ३ रे वर्ष होते.

गोपाळ तिवारी म्हणाले, खाद्य व्यवसायातून पुणेकरांची सेवा करणाऱ्या बेडेकर मिसळ यांचा हा सन्मान आहे. ग्राहकांप्रती असलेली सत्यत्या आणि गुणवत्ता जोपासणे देखील महत्वाचे असते, हे काम बेडेकर कुटुंब करीत आहे. त्यांच्या ३-४ पिढयांचे समर्पण या व्यवसायाला लाभले आहे. पुण्यातील सर्व पक्षीय नेते, कलावंत येथे नेहमी जमतात. त्यामुळे बेडेकर मिसळ हा सांस्कृतिक संवादाचा कट्टा बनला आहे.

डॉ.न.म. जोशी म्हणाले, माझे वडील आचारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. सुरुवातीला पूना गेस्ट येथे माझे वडील कार्यरत होते. त्यामुळे पूना गेस्ट हाऊस, त्यानंतर मुरलीधर भोजनालय आणि यंदा बेडेकर मिसळ यांना गौरविण्यात आले. त्याकाळी ५० पैशात मिसळ मिळत होती, असे सांगत अनेक आठवणींना त्याने उजाळा दिला, असेही त्यांनी सांगितले. संकेत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading