Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

रांगोळी, पथनाट्य आणि ‘वंदे मातरम्’मधून देशभक्तीची झलक

पुणे :   दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान-2026’ आणि ‘सेवा ही संस्कृती’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सेवा ही संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा उद्देश समाजात सेवा, स्वच्छता, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक जागृतीची भावना अधिक दृढ करणे हा आहे. हे अभियान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये रांगोळी निर्मिती व प्रदर्शन, पथनाट्य तसेच राष्ट्रभक्तीपर गीत ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणाचा समावेश आहे.

‘सेवा ही संस्कृती’ कार्यक्रमांतर्गत आर्मी पब्लिक स्कूल, देहू रोड येथील इयत्ता 11वीच्या 16 विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून भारतीय संस्कृती, स्वच्छता आणि सेवा भावनेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणाने करण्यात आली.

यासोबतच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा ही संस्कृती’ या संकल्पनेवर आधारित ‘वंदे मातरम् – पूर्वांचल छात्र’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूर्वांचलातील विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे प्रभावी गायन केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘सेवा ही संस्कृती रांगोळी प्रदर्शन’ देखील आयोजित करण्यात आले. कला साधक शीतल कांबळे, आशा गभाले, छाया गायकवाड, आसावरी बर्वे आणि अनिता रोकडे यांनी साकारलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, राष्ट्रभावना, सेवा, स्वच्छता आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी पथनाट्याच्या माध्यमातूनही भारतीय संस्कृती, स्वच्छता आणि सेवा भावनेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. या पथनाट्यात संजय चांदगुडे, लीना आढाव, मंदार फाकटकर, गणेश आढाव, आसावरी बर्वे आणि शोभा पवार यांनी सहभाग घेतला. पथनाट्याचे दिग्दर्शन उपाध्यक्ष नरेंद्र आमले यांनी केले.

कार्यक्रमातून ‘सेवा हे केवळ एक कार्य नसून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे’ असा संदेश देण्यात आला. कला, संस्कृती आणि सेवा भावनेचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी तात्या बापट समितीच्या वैशाली ताई आठल्ये, राजेंद्र दादा काकडे, ज्येष्ठ कला साधक रोहिणी जोशी आणि सुनीता जुन्नरकर यांनी उपस्थित राहून सहभागी कला साधकांचे उत्साहवर्धन केले.

कार्यक्रमाला संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कपोते, सचिव लीना आढाव, उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णूरकर व नरेंद्र आमले, कोषाध्यक्ष प्रचिती भिष्णूरकर, मंचीय कला संयोजक भावना सामंत, नाट्य विधा संयोजक संजय चांदगुडे, सहसचिव आसावरी बर्वे, रांगोळी विधा प्रमुख अनिता रोकडे, बाल विधा प्रमुख रती देशमुख, संपर्क प्रमुख गणेश आढाव, शोभा पवार यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कला साधक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading