गानसरस्वती महोत्सवात सायंकालीन रागरूपांसह रंगला देखणा नृत्याविष्कार
पुणे : मावळत्या संध्याकाळचे विविध रंग, गानसरस्वती संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या सत्रात कंठसंगीताच्या आणि भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून प्रकटले. गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे सायंकाळचे सत्र सायंकालीन रागाविष्कारांनी स्मरणीय ठरले.
ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेले नाट्यसंपदा प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सदर महोत्सव साजरा झाला.
रविवारच्या सायंकालीन सत्राची सुरुवात युवा गायक विराज जोशी यांच्या गायनाने झाली. किशोरीताईंना आदरांजली अर्पण करताना विराज म्हणाले, “मी लहान असल्यापासून या महोत्सवात येत आहे. आज प्रथमच या मंचावर गायन सादर करणार आहे. मला ही संधी मिळणे, हा किशोरीताईंचाच आशीर्वाद आहे, अशी माझी भावना आहे. ताईंनी त्यांच्या पुण्यातील अखेरच्या मैफिलीत गायिलेले सुखिया बिलावल आणि हुसैनी तोडी हे राग आजही माझ्या स्मरणात आहेत. मी माझे गायन त्यांना समर्पित करतो.” असे सांगून राग पटदीपने विराज यांनी सुरुवात केली. विलंबित एकतालातील ‘धन धन भाग…’ आणि द्रुत त्रितालातील ‘पिया नही आये…’ या बंदिशींतून त्यांनी मांडणी केली. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…’ या अभंगाने त्यांनी विराम घेतला. त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (हार्मोनिअम), माऊली टाकळकर (टाळ), गणेश आलम आणि ओंकार आलम (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
महोत्सवातील दुसरी प्रस्तुती गायिका विदुषी अपर्णा पणशीकर यांची होती. या सुप्रतिष्ठित आणि पवित्र मंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राग शुद्ध नटमधील ‘आंख न मोरी लागी रे…’ (विलंबित तीनताल), राग नटबिहागमधील ‘डमरू डमडम बाजे…’ (त्रिताल) आणि राग नायकी कानडामधील ‘रतिया मै जागी…’ या बंदिशींतून अपर्णा यांनी सादरीकरण केले. त्यांना संजय देशपांडे (तबला), लिलाधर चक्रदेव (हार्मोनिअम) तसेच संपदा बेलवलकर व अदिती साठे यांनी स्वर व तानपुरा साथ केली.
त्यानंतर प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि संरचनाकार डॉ. स्वाती दैठणकर, त्यांची कन्या व शिष्या नुपूर दैठणकर यांनी शिष्यांसह भरतनाट्यम नृत्यातून देखणे सादरीकरण केले. शिवपंचाक्षर स्तोत्राचा आशय पाच मात्रांच्या खंडजातीतून त्यांनी मांडला. त्यानंतर डॉ. स्वाती आणि नुपूर दैठणकर यांनी अर्धनारीश्वर या संकल्पनेवर आधारित प्रस्तुती केली. शिव आणि शक्तीच्या विविध क्रीडा त्यांनी दर्शवल्या. पाठोपाठ श्री आदी शंकराचार्य विरचित ‘भज गोविंदम्…’ ही रचना स्वाती दैठणकर यांनी आंगिक अभिनयाचे उत्तम दर्शन घडवत प्रस्तुत केली. त्यांना निथी नायर (गायन), प्राजक्ता बापट (नटु अंगम्), पंचम उपाध्याय (मृदंगम्), बालसुब्रह्मण्यम् (व्हायोलीन), संजय शशिधरन् (बासरी) यांनी साथसंगत केली. सादारीकरणामध्ये प्राजक्ता बापट, राजलक्ष्मी बागडे, मैथिली साने, गौरी बुरडे, प्रांजली गोरे, सई अभ्यंकर, साधना पंडित, तनया माणकेश्वर, मृणाल बोकील, वैष्णवी औरसंग यांचा सहभाग होता. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
