भाजप खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल
मुंबई प्रतिनिधी
भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात असून आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
कणकवलीतील स्थानिक नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी, “आता थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असतात,” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.
त्याच भाषणात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे कौतुक करत ते अत्यंत कर्तृत्ववान असून आपल्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे सांगितले होते. मुलांना आशीर्वाद देताना त्यांनी “नांदासौख्य भरे” अशी शुभेच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण असून समर्थक आणि कार्यकर्ते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
