Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे मेट्रोत सुलभ प्रवासासाठी ‘रुपे ऑन-द-गो’ कार्डची सुविधा सुरू

एनपीसीआय व एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने नवा उपक्रम

पुणे  : पुणे मेट्रोतील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व आधुनिक करण्याच्या दृष्टीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने महा मेट्रो आणि पुणे मेट्रोसाठी विशेष अ‍ॅक्वायरर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने ‘रुपे ऑन-द-गो’ (OTG) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे प्रवासी त्यांच्या विद्यमान रुपे ऑन-द-गो कार्डच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या सर्व कार्यरत स्थानकांवर सहज ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ करू शकणार आहेत.

संपर्करहित व इंटरऑपरेबल पेमेंट प्रणालीवर आधारित ही डिजिटल तिकीट सुविधा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. यामुळे कागदी तिकीट, मोबाइल क्यूआर तिकीट तसेच एचडीएफसी बँक वन पुणे एनसीएमसी रुपे कार्डच्या जोडीने आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो कार्डचाही पर्याय उपलब्ध झाला आहे.

या नव्या सुविधेमुळे पुणे मेट्रोच्या अ‍ॅक्वा आणि पर्पल मार्गिकांवरील सर्व 29 कार्यरत स्थानकांवर कोणतेही विद्यमान किंवा नवीन रुपे ऑन-द-गो कार्ड वापरून प्रवास करता येणार आहे. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रत्येक प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट घेण्याची गरज राहणार नाही.

रुपे ऑन-द-गो कार्डमुळे बस व मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटी मिळणार असून ऑफलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नेटवर्क कमी असलेल्या भागांमध्येही प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा होणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हार्दिकर, आयएएस म्हणाले, “एनसीएमसी कार्ड इंटरऑपरेबिलिटीची सुरुवात हा पुणे मेट्रोसाठी परिवर्तनकारी टप्पा आहे. ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ व आधुनिक करेल. सार्वजनिक वाहतूक अधिक प्रवासी-अनुकूल बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

एनपीसीआयच्या कार्यकारी संचालिका (ग्रोथ) सौ. सोहिनी राजोला म्हणाल्या, “पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो सुरू करणे हे शहरी गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर अधिक व्यापक होऊन तो सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल.”

एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स व डिजिटल बँकिंग चॅनेल प्रमुख श्री. राजनिश परमानंद प्रभू यांनी सांगितले, “रुपे ऑन-द-गो कार्डमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाचा दर्जा उंचावेल. पुणे मेट्रोसाठी या उपक्रमाचा भाग होण्याचा आम्हाला आनंद आहे.”

पुणे मेट्रोत रुपे ऑन-द-गो स्वीकारल्यामुळे देशभरातील विविध मेट्रो व बस सेवांमध्ये एनसीएमसीचा अवलंब वाढण्यास मदत होणार आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कानपूर आदी शहरांतील मेट्रो सेवा तसेच विविध शहरांतील बस सेवांमध्येही या कार्डचा वापर करता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading