संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक प्रेमाने नव्हे तर भीतीने
राज ठाकरे यांचा सरसंघचालक भागवत यांच्यावर निशाणा
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आलेले अनेक विख्यात लोक संघावरील प्रेमासाठी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे उपस्थित राहिल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. इतरांना उपदेशाचे डोस पाजण्यापूर्वी राज्यावर हिंदीची सक्ती करणाऱ्या सरकारचे कान टोचून दाखवा, असेही ठाकरे सरसंघचालकांना उद्देशून म्हणाले.
भाषेचा आग्रह करणे आणि त्यासाठी आंदोलने करणे हा एक स्थानिक पातळीवरचा रोग असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले होते. या विधानावरून राज ठाकरे यांनी भागवत यांच्यावर कठोर टीका केली आहे.
संघाच्या कामाबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, अप्रत्यक्षपणे राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत संघाने पडू नये. राजकीय भूमिका घ्यायचीच असेल तर सर्वप्रथम देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा, असे आव्हानच राज ठाकरे यांनी सरसंघचालकांना दिले.
गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत, असा सवालही राज ठाकरे यांनी भागवत यांना केला.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
