पहिला ‘इकोल क्रिकेट गौरव सन्मान’ माजी रणजीपटू, प्रशिक्षक हेमंत किणीकर यांना प्रदान
पुणे : इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने पहिला ‘इकोल क्रिकेट गौरव सन्मान’ महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माजी रणजीपटू आणि नामांकित प्रशिक्षक व महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला संघाचे प्रशिक्षक हेमंत आनंद किणीकर यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार इकोल फाऊंडेशनचे संचालक शुभेंद्र भांडारकर, अंशुल शर्मा, दर्शन जिंदल आणि प्रत्युष भारतीय यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जितेंद्र शेंडगे, मनोज पवळे आदि मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह आणि रोख २५ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रस्तावनेमध्ये शशांक जोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरूवात करताना शशांक जोशी म्हणाले की, हेमंत किणीकर यांनी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या काळामध्ये ते पश्चिम विभागाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना त्यांनी त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने गाजवले आहेत. हेमंत किणीकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५ च्या सरासरीने २३०० हून अधिक धावा काढल्या असून यामध्ये ६ शतके आणि ११ अर्धशतके समाविष्ट आहेत. नाबाद २०५ अशी त्यांची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती. आपल्या पदार्पणाच्या रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी साडेसातशेहून अधिक धावा चोपल्या होत्या आणि महाराष्ट्र संघाला रणजी करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
फाऊंडेशनचे संचालक शुभेंद्र भांडारकर म्हणाले की, क्रिकेट निवृत्तीनंतर हेमंत किणीकर यांनी क्रिकेटची सेवा कायम ठेवताना पुण्यात प्रशिक्षण अकादमी सुरू केली. सध्या ते महाराष्ट्र २३ वर्षाखालील महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पहात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआय २३ वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले होते. युवा खेळाडूंना घडविण्यात आणि राज्यातील क्रिकेट क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.
पुरस्काराला उत्तर देताना हेमंत किणीकर म्हणाले की, हा फाऊंडेशनचा पहिलाच पुरस्कार मला दिल्ल्याबद्दल मी इकोल फाऊंडेशनचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार पीवायसी हिंदू जिमखाना आणि माझे गुरू कै. श्री. माधवराव बापट यांना समर्पित करतो. मी आजवर केलेल्या क्रिकेटसाठीच्या सेवेचा हा सन्मान असून मी माझी क्रिकेटबद्दलची निष्ठा कायम सुरू ठेवणार आहे. नव्या पिढीला उद्देशून बोलताना ते म्हणाले की, मुलांनी आव्हानात्मक परिस्थितीत खेळले पाहीजे आणि जिंकणे हेच ध्येय असले पाहीजे. इकोल लाल चेंडूने आणि कसोटी क्रिकेट स्पर्धेचे सामने आयोजित करत असून ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे, असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
