Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रफुल्ल पटेल हे मोदी, शहा यांचे भक्त ; संजय राऊत यांचा आरोप

 

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे भक्त असून मोदी, शहा यांच्या आदेशानुसारच पटेल हे निर्णय घेतील, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

पक्षाचा नेता निवडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे विधान पटेल यांनी केले होते. त्यावर राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पवारांचा आहे, पटेल यांचा नाही, हे सुनावतानाच राऊत यांनी पटेल यांच्यावर पवारांच्या कुटुंब प्रमुखाच जबाबदारी सोपवली आहे काय, असा उपरोधिक सवालही केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे भारतीय जनता पक्षाच्या कंपनीचे शेअर होल्डर आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार यांनी कधीही भाजपची विचारसरणी आपल्यावर लादून घेतली नाही. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा आपला विचार कधीही खुंटीवर टांगला नाही, असेही राऊत म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू असती तर अजित पवार यांनी आपल्याला त्याची कल्पना दिली असती, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा अट्टाहास काही कामाचा नाही. जाती अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या एकत्रीकरणाची कल्पना दिली नाही त्याअर्थी अजित पवार यांचा फडणवीस यांच्यावरती विश्वास नव्हता, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading