पंकजा मुंडे यांना घालू दिला नाही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार
लातूर प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील जानवळ या गावी प्रचार सभेसाठी आलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांना गावकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यापासून रोखले. मुंडे यांनी डॉ. आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गावातील मैदानात पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. मैदानाच्या जवळच असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन न केल्याचे पंकजा मुंडे यांच्या सभा संपल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे सभा संपल्यावर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची इच्छा मुंडे यांनी व्यक्त केली. मात्र, सभेपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन न केल्यामुळे त्यांचा अवमान झाला आहे, असा आक्षेप घेत गावकऱ्यांनी सभेनंतर मुंडे यांना डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यास मनाई केली.
वातावरण चिघळत असल्याचे पाहून पंकजा मुंडे यांनी पुतळ्याला हार न घालता लांबूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व सभास्थळावरून काढता पाय घेतला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांवरही गावकऱ्यांनी आरोप केले. इथे येणारा प्रत्येक उमेदवार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो याची जाणीव रोहिदास वाघमारे यांना नाही का, असा सवाल गावकऱ्यांनी केला. गावात एखाद्याने कपाळाला नीळ लावली तर नीळ का लावली, असा प्रश्न रोहिदास वाघमारे करत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाचव्या पिढीतील सदस्य गावात आले त्यावेळी गावाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले नाहीत. पंकजा मुंडे सभेसाठी गावात आल्या तेव्हा रस्त्यावरचे सगळे खड्डे बुजवण्यात आले, याबद्दलही गावकऱ्यांनी आक्षेप नोंदवला.
