Monday, April 6, 2026
Latest NewsPUNE

औंध रस्त्यावरील उड्डाणपूलाबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करणार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील माने यांना आश्वासन

पुणे : औंध रस्ता ते खडकी रस्त्यावर नेहमी वर्दळ असते, लोकांच्या कामाचा वेळ प्रवासात वाया जातो. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपूल अथवा भूमिगत रस्ता करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी राज्यशासनाकडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतुबंधन योजनेतून हा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. आज याबाबत सुनील माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेऊन असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याबाबत पत्र देऊन विनंती केली. त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या रस्त्याची पाहणी करून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार तसेच इतर आवश्यक संस्थांना देण्याचे आश्वासन दिले.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, औंध रोड, खडकी स्टेशन रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. हाच रस्ता पुढे खडकी पोलिस स्टेशन जवळून राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. या मार्गावर असलेल्या खडकी पोलिस स्टेशनच्या पाठीमागे रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून रस्ता जाऊन तो राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी,कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र हा अंडरब्रिज रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते.

हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्गासाठी असलेल्या विशेष तरतुदीतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माने यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यावर त्यांनी राज्य सरकार कडून प्रस्ताव आल्यास केंद्र सरकारच्या सेतुबंधन योजनेमधून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे राज्य सरकार मार्फत केंद्राच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला हा प्रस्ताव जाणे गरजेचे असल्याचे ही माने यांनी या भेटीत श्री. बाविस्कर यांना सांगितले. यावर त्यांनी लवकरच याबाबत पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याचे तसेच हा प्रस्ताव राज्य शासनासह आवश्यक संस्थाना पाठवण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading