Monday, June 15, 2026
Latest NewsSports

स्मॅशर योद्धाज संघाची विजयी सलामी

पुणे : हितेश मलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर स्मॅशर योद्धाज संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेत मोल्डर्स संघावर सहा गडी राखून मात करून विजयी सलामी दिली. सारडा स्टॅलियन आणि साईज मास्टर स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

नेहरू स्टेडियमवर शनिवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रख्यात उद्योजक राजेश कासट, बेहडे ग्रुपचे निशांत बेहडे, मेटारोल ग्रुपच्या राधिका बिर्ला, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश सोमानी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, क्रीडा अध्यक्ष नीरज धूत, क्रीडा सचिव गितेश झंवर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत मोल्डर्स संघाने निर्धारित १२ षटकांत ४ बाद ९७ धावा केल्या. यात कर्णधार सुमीत मुंद्राने २२ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. स्मॅशर योद्धाज संघाने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत चार गडींच्या मोबदल्यात साध्य केले. यात सलामीवीर हितेशने ३६ चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. त्याला किरण चांडकने साथ दिली.

दुसऱ्या लढतीत साईज मास्टर स्मॅशर्स संघाने प्ररव पँथर्स संघावर ३९ धावांनी मात केली. यानंतर तिसऱ्या लढतीत सारडा स्टॅलियन संघाने हाय-बाइट चॅलेंजर्स संघावर १० धावांनी मात केली.

स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे मुख्य प्रायोजक असून, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला पाठिंबा दिला आहे. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर आहेत. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर म्हणून सहभागी आहेत. याशिवाय डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, टायटल स्पॉन्सर बेहडे बिल्डकॉन एलएलपी यांनी सलग दुसऱ्या वर्षी दिलेल्या पाठिंब्यामुळे यंदाची पीएमपीएल स्पर्धा अधिक भव्य, उत्कृष्ट आणि दमदार होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : मोल्डर्स – १२ षटकांत ४ बाद ९७ (सुमीत मुंद्रा नाबाद ४३, अभिषेक झंवर २०, प्रथमेश झवर १२, आयुष राठी २-०-२०-२, वरुण भुतडा १-०-९-१, अभय जाजू २-०-२१-१) पराभूत वि. स्मॅशर योद्धाज – ११.३ षटकांत ४ बाद ९८ (हितेश मल नाबाद ५१, किरण चंडक नाबाद १४, प्रथमेश झवर ३-०-२१-३, अमित बिहानी ३-०-२३-१). सामनावीर – हितेश मल.

सारडा स्टॅलियन – १२ षटकांत ४ बाद ९३ (रोहित राठी ३३, गितेश झवर नाबाद १८, यश लढ्ढा १३, श्रीराम चंडक २-०-८-२, आयुष काब्रा ३-०-२०-१, कन्हैया लढ्ढा ३-०-१३-१) वि. वि. हाय-बाईट चॅलेंजर्स – १२ षटकांत ८ बाद ८३ (सर्वेश भट्टड ४६, श्रीराम चंडक १२, हृषीकेश झंवर १०, सागर कारवा २-०-९-३, मधुसुदन कलंत्री ३-०-१७-२, अमित राठी ३-०-१८-२). सामनावीर – अमित राठी.

साईज मास्टर स्मॅशर्स – १२ षटकांत ८ बाद १३९ (अमर झवर ३२, गिरिराज मोहता ४२, केदार बजाज ३७, गोपाल जाजू ३-०-२९-४, धीरज मंत्री ३-०-१२-१, अंकित बजाज १-०-१७-१) वि. वि. प्रारव पँथर्स – १२ षटकांत ७ बाद १०० (हर्ष दरक ३१, धीरज मंत्री १९, नयन भन्साली ३-०-२३-३, अमर झंवर २-०-१६-२). सामनावीर – अमर झंवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading