Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार – ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर

 

पुणे  : शास्त्रीय संगीताची साधना जेव्हा सुरु होते तेव्हा तानपुऱ्याच्या त्या चार तारा एकाग्र मनाने एका सुरात लावणे, तो तानपुरा छेडणे आणि नंतर त्या तानपुऱ्यात वाजणाऱ्या षड्ज मध्ये आपला सूर बेमालूमपणे मिसळणे यामध्ये जे मन एकाग्र करावे लागते तो क्षण म्हणजे प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार असतो, असे मत ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी व्यक्त केले.

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संपन्न झाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंडळाच्या वतीने माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कलाश्री पुरस्कार यावर्षी आरती अंकलीकर- टिकेकर यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे हे २८ वे वर्ष असून रोख रु. १ लाख ५१ हजार १०१, मानचिन्ह आणि मानपत्र असे कलाश्री पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजू शेठ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक प्रशांत शितोळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, प्रसिद्ध कीर्तनकार चेतनानंद गावडे महाराज, प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले, ओअॅसिस एन्टरप्राईजेस मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संगीत अलंकार महेश जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक आणि किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याबरोबरच मंडळाच्या वतीने शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कलाश्री युवा पुरस्कार पं योगेश समसी यांचे शिष्य, युवा तबला वादक सोहम गोराणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रु. ११ हजार मानचिन्ह व मानपत्र असे कलाश्री युवा पुरस्काराचे स्वरूप आहे

आपला सुंदर तानपुरा आपल्याला सुरात मिळवता आला, तो सुंदर छेडीता आला की तो जणू काही आपली जपमाळ बनतो. यानंतर मन एकाग्र करायचे आणि त्या तानपुऱ्याच्या झनकारात उमटणाऱ्या स्वरात आपला स्वर असा मिसळायचा की तो वेगळा वाटताच कामा नाही इथे आपल्या संगीताच्या साधनेला सुरुवात होते, असेही अंकलीकर म्हणाल्या.

मन एकाग्र करणे म्हणजे काय, याची सुरुवात मला गुरुंनी अशीच करून दिली. माझा प्रत्येक पुरस्कार म्हणूनच माझे सर्व गुरु आणि आई वडील यांना समर्पित आहे असे सांगत आरती अंकलीकर टिकेकर पुढे म्हणाल्या, “शास्त्रीय संगीताची साधना ही खडतर आणि कष्टाची साधना आहे. यामध्ये सुरुवातीची अनेक वर्षे विद्यार्थी हा फक्त रियाजच करीत असतो. कोणत्याही प्रकारचे यश, प्रसिद्धी ही त्याला सुरुवातीच्या या काळात मिळत नाही. केवळ रियाज करत राहणे आणि गात राहणे हेच संगीत साधकाचे काम असते. त्यामुळे ज्यांना गायला आवडते, वाजवायला आवडते त्यांनीच या क्षेत्रात यावे असा सल्लाही आरती अंकलीकर टिकेकर यांनी दिला. माझ्या यशाचे श्रेय हे श्रोत्यांचे देखील आहे असेही त्यांनी नमूद केले.

कलाश्री संगीत महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने झाली. राधानंद संगीत विद्यार्थ्यांच्या समूहाने झपताल चे सादरीकरण केले. त्यांना जान्हवी ढोरे (संवादिनी) आणि स्मितीश कुर्वे (तबला) यांनी साथसंगत केली. यानंतर कलाश्रीच्या पहिल्या समूहाने राग मारवा तर दुसऱ्या समूहाने राग गावती गायला.

त्यानंतर पं. सुधाकर चव्हाण यांनी राग मारुबिहागची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकतालात ‘रसिया हो ना जा…’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी तीन तालात ‘कैसे कैसे जाऊ मथुरा नगरी…’ ही रचना सादर केली. संत सोयराबाई यांनी लिहिलेला ‘अवघा रंग एक झाला…’ या अभंगाच्या सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. पं. सुधाकर चव्हाण यांना नंदकिशोर ढोरे (तबला), प्रभाकर पांडव (संवादिनी), शाश्वती चव्हाण, आकाश मोरे, रवी पांचाळ (तानपुरा व गायन), गंभीर महाराज अवचार (पखवाज), शिवाजी डाके (टाळ) यांनी साथसंगत केली.

यानंतर रईस बाले खान यांनी आपल्या सतारवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी यावेळी राग सरस्वती वाजविला. यामध्ये त्यांनी सुरुवातीला आलाप जोड झालाचे सादरीकरण केले. यानंतर त्यांनी मध्यलय तीनताल आणि द्रुत तीन तालातील बंदिश वाजवली. ‘बोलावा विठ्ठल…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. ऋषिकेश जगताप यांनी तबल्यावर पूरक साथसंगत केली.

२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप ऋजुता सोमण यांच्या बहारदार नृत्य प्रस्तुती झाला. ‘म्हारो प्रणाम…’ या रचनेने ऋजुता यांनी वंदना सादर केली. यानंतर त्यांनी तीनतालाचे सादरीकरण केले. विलंबित लयीत उठान, थाट, आमद, काली परण यांचेही सादरीकरण त्यांनी केले. द्रुत लयीत गिनती प्रस्तुत करीत त्यांनी आपली नृत्यावरील पकड दाखवून दिली. पुतना वधाची कथा आपल्या नृत्यातून सादर करीत त्यांनी उपस्थितांची वाह वाह मिळविली. ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतावरील नृत्याच्या सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. ऋजुता सोमण यांना पं. रामदास पळसुले (तबला), अमेय बिचू (संवादिनी), जयदीप वैद्य (गायन) आणि नेहा दामले (पढंत) यांनी साथसंगत केली. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading