Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘विलीनीकरणाच्या चर्चेमुळेच शपथविधीची घाई

 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात हालचालींना वेग

मुंबई प्रतिनिधी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन पुन्हा एकसंध पक्ष उभारण्याच्या चर्चांना वेग आल्यामुळेच भवितव्याबाबत काही जणांच्या मनात साशंकता असल्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला घाई करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.

खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांच्या प्रमाणेच दोन्ही पक्ष एकत्र यावे, अशी आपली इच्छा असल्याचे आजच स्पष्ट केले. त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाचे नियोजन अजित पवार यांनीच केले होते, हे देखील त्यांनी उघड केले.

विलीनीकरण झाल्यास अखंड राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये, अर्थात महायुतीमध्ये असणार का, असेल तरी उपमुख्यमंत्री पद व अन्य महत्त्वाची खाती आपल्या गटाच्या लोकांकडे राहणार का, याबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये साशंकता आहे. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्या पश्चात अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला महत्त्व शिल्लक राहणार का, याबद्दलही काहींना शंका आहे. त्यामुळेच शपथविधीची घाई होत असल्याची चर्चा आहे.

एकीकडे अजित पवार यांचे रक्षाविसर्जन होत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षातील राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या मंडळींनी मुंबईत बैठका घेत उपमुख्यमंत्री पद आणि खाते वाटपाबद्दल चर्चा करण्याची घाई केली, याबद्दल पवार कुटुंबीय नाराज असल्याचे प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी देखील थेट नराजी व्यक्त न करता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून त्याबद्दल आपल्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि आपण त्या चर्चेत पडण्याचे कारणही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याच पत्रकार परिषदेत विलीनीकरणानंतर भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर शरद पवार यांनी, इथे भारतीय जनता पक्ष कुठे येतो, असा प्रति सवाल केला. अजित पवार गट सध्या भाजपा बरोबर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी, तिसऱ्या कोणत्याही पक्षाबद्दल आम्ही चर्चा केलेली नाही, असे संदिग्ध उत्तर दिले आहे.

प्रत्यक्षात, राष्ट्रवादी पक्षाचे एकत्रीकरण हा भाजपच्या आराखड्याचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपपासून हरकत घेऊन स्वतंत्र लढवणे तसेच पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र येणे, अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर केलेली आगपाखड, महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा दारुण पराभव होऊन देखील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवण्याचा अजित पवार यांचा आग्रह, शरद पवार गटाच्या उमेदवारांनी घड्याळाचे चिन्ह स्वीकारण्याचा आग्रह हे सगळे भाजपचे स्क्रिप्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळाtt आहे.

वास्तविक महाराष्ट्रामध्ये भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसची अजिबात आवश्यकता नाही. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रातील शरद पवार यांच्या पक्षातील खासदार भाजपचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे अवलंबित्व कमी करू शकणार आहे. त्यामुळे राज्यापेक्षा केंद्रात भाजपाला अखंड राष्ट्रवादीची गरज आहे. अखंड राष्ट्रवादी प्रत्यक्षात आल्यास सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्री पद तसेच राज्यात रोहित पवार यांना राज्यमंत्री पदं, जयंत पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिमंडळ अशी तडजोड संयुक्त राष्ट्रवादी पक्षाबरोबर भाजपने केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading