भारतीय ग्राहकाचा पाश्चात्यीकरणाचा वेग कमी; दामोदर मॉल यांचे निरीक्षण
पुणे : जागतिकीकरणाच्या इतक्या वर्षांनंतर भारतीय ग्राहक हा आधुनिक, विकसित, उदयोन्मुख व आग्रही झाला असला तरी, अद्याप त्याचा पाश्चात्यीकरणाचा वेग हा कमी असल्याचे निरीक्षण रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर मॉल यांनी नोंदविले. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) यांच्या पुणे विभागाच्या वतीने नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे आयोजित २० व्या पुणे डिझाईन महोत्सवामध्ये झालेल्या बीजभाषणावेळी मॉल बोलत होते.
पुणे डिझाईन महोत्सवाच्या दोन दिवसीय कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली. डिझाईन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे डिझाईन महोत्सवाची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना ही ‘इंडिया लेन्स’ ही होती. महोत्सवात प्रोडक्ट डिझाईन, आर्किटेक्चर आणि ग्राफिक डिझाईन यांसारख्या क्षेत्रातील ३० हून अधिक नामवंत वक्ते आपले विचार मांडणार असून देशातील, राज्यातील व शहरातील अनेक महत्त्वाचे उद्योजक, डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. महोत्सवादरम्यान चर्चासत्रे, कार्यशाळा, ओपन हाऊस सत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात दामोदर मॉल यांच्या बीजभाषणाने झाली. मॉल यांनी यावेळी ‘डिझायनिंग ‘ब्रँडेड स्पेसेस फॉर फुलर इंडिया’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेवर आधारित काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. मॉल म्हणाले की, “भारतीय ग्राहक हा बदलत असला तरी तो हळूवारपणे पाश्चात्यीकरणाकडे वळत आहे. ऑनलाईन खरेदी करता परदेशातील ग्राहक हा खूप जागरूकपणे खरेदी करतो आणि त्याला जेव्हा खरेदी करायची असेल तेव्हाच तो ऑनलाईन अॅपचा वापर करतो. या उलट भारतीय ग्राहक हा बऱ्याचदा विंडो शॉपिंग करताना पहायला मिळतो, ज्या गोष्टी आवडत आहेत त्या तो कार्टमध्ये टाकतो मात्र त्या गोष्टींची खरेदी करताना आजही कुटुंब, संस्कृती आणि समाज यांचा पगडा भारतीय ग्राहकांवर दिसून येतोच. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवावर त्याची खरेदी अवलंबून असते असे म्हणाता येईल.”
याबरोबरच भारतीय ग्राहकाला परदेशी ग्राहकांसारखा ‘डू इट युवरसेल्फ’ हा प्रकार आवडत नसून त्यांचा भर ‘डू इट फॉर मी’ या प्रकारावर आहे असे सांगत मॉल पुढे म्हणाले, “आज भारतीय ग्राहक स्वत:ला हे हवे आहे ते मागतोय मात्र त्यासाठी आपल्या जुन्या सवयी सोडत नाहीये असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी लक्झुरी हॉटेल किंवा विमान प्रवासात भारतीय ग्राहक आपल्या आवडीचा मसाला चहा मागण्यास मागे पुढे पहात होता, मात्र आज कोणत्याही विमान प्रवासात किंवा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ते हमखास आपला मसाला चहा आवडीने मागावतात आणि त्याचा आस्वाद घेतात. याशिवाय आपली आवडती पाणीपुरी खाणे ग्राहकांनी अद्याप सुरु ठेवले असून फक्त आता बिस्लेरी पाण्यामधील पाणीपुरी खाण्याकडे त्यांचा जास्त कल आहे.”
यानंतर आयकिया रिटेलचे मुख्य क्रिएटिव्ह डायरेक्टर मार्कस एंगमन यांनी ‘मेकिंग चेंज अॅट स्केल’ या विषयावर बीजभाषणाद्वारे आपले विचार मांडले. या आधी कलरिपयट्टूचे अभ्यासक, आंतरविद्याशाखीय कलाकार असलेल्या हर्षवर्धन व राजवर्धन कदम या कलाकारांनी ‘बिंदू’ हा मार्शल परंपरा, ताल आणि समकालीन अभिव्यक्ती असलेला कार्यक्रम सादर केला. शिवाय अनुज शर्मा यांचे ‘नो स्टीच, ऑल स्टाईल’ या विषयावरील कार्यशाळा, डिझाईन फॉर इंडिया अंतर्गत दर्शन गांधी व किमया गांधी यांची व्याख्याने, रॉयल फिलिप्सचे माजी मुख्य डिझाइन अधिकारी व कार्यकारी उपाध्यक्ष शॉन कार्नी, कोपनहेगन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरॅक्शन डिझाइन (सीआयआयडी) च्या सहसंस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सिमोना मास्की यांच्या कार्यशाळा देखील महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संपन्न झाल्या.
