पार्थ पवार यांची लागणार राज्यसभेत वर्णी
सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर होणार निवड
मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार स्वीकारणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या राज्यसभेत रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांची निवड केली जावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बहुतेक नेत्यांचा आग्रह आहे. त्यानुसार पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या असून आज दुपारी त्यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात येईल. त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. अजित पवार यांच्याच बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून त्या विधानसभेत येतील अथवा विधान परिषदेत जागा निर्माण करून त्यांना स्थान देण्यात येईल.
उपमुख्यमंत्री पदाबरोबरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी, हा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ऐरणीवर आला आहे. सध्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असलेले प्रफुल्ल पटेल यांच्यावरच राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या नावाला उघडपणे नाही तरी छुपा पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता आहे. ही शक्यता उद्भवू नये यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील सुनेत्रा पवार यांनीच घ्यावी, अशी मागणी ही नेते करीत आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेलाही वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील दोन्ही पक्ष एकत्र यावे ही अजित पवार यांच्याप्रमाणे आपली ही इच्छा असल्याचे आज स्पष्ट केले आहे. याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून दोन्ही पक्षाचे नेते याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया तातडीने पार पडल्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद ही अजित पवार गटासमोर फार मोठी समस्या शिल्लक राहणार नाही.
