जय गुरु… च्या जयघोषात श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा
पुणे : जय गुरु आणि टाळ मृदूंगाचा नादघोष… पारंपरिक वेशातील भाविक अशा भक्तीमय वातावरणात श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा थाटात काढण्यात आला. शिवाजीनगर गावठाण येथील श्री रोकडोबा मंदिर येथून ही मिरवणूक काढण्यात आली. कपाळी गुलाल-बुक्का लावून पादुकांचे दर्शन घेत भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. तसेच भाविकांना १००० किलो गव्हाच्या खिरीचा प्रसाद देखील मंदिरात देण्यात आला.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येतो. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले. महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथून शिवाजीनगर गावठाण परिसरात काढण्यात आली. टाळ-मृदुंगांचा गजर आणि कपाळी गुलाल-बुक्का लावून भाविक मिरवणुकीत मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.
पालखीची मिरवणूक घेऊन भजनकरी पारंपारिक रित्या गेले १३६ वर्ष रोकडोबा मंदिरापासून जंगली महाराज समाधी मंदिरापर्यंत टाळ मृदंगाच्या घोषात मंदिरामध्ये मध्यरात्रीनंतर येतात. मंदिरात तयार केलेला खिरीचा महाप्रसाद हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी बारानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत जवळजवळ चार ते पाच हजार भाविक घेऊन जातात.
मंदिरात तब्बल २३० किलो गूळ, २१० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि २० किलो ड्रायफ्रुट वापरुन सलग ६ ते ७ तास सुमारे १० ते १२ सेवेक-यांनी १००० किलो गव्हाच्या खिरीचा प्रसाद तयार केला. भव्य कढईमध्ये खीर तयार करतानाचे दृश्य पाहण्याकरिता देखील भाविकांनी मोठी गर्दी केली. खिरीचा प्रसाद हे सन १९६५ पासून उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
पालखी सोहळा आणि महाराजांची आरती झाल्यानंतर त्याच अग्निने चूल पेटविली जाते. भव्य कढईमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या पटांगणात हा प्रसाद केला जातो. मोठया संख्येने भाविक हा प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात.
