Thane : महापौर व उपमहापौर पदांसाठी नावांवर शिक्कामोर्तब
ठाणे : महापालिकेच्या सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष भागीदारी करणार हे निश्चित झाले असून महापौर व उपमहापौर पदाची नावे देखील अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी निश्चित करण्यात आली आहेत.
महापौर पदासाठी शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील हे उमेदवार असणार आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 75 नगरसेवक निवडून आले असून भाजपचे 28 जण निवडून आले आहेत. सुरुवातीला भाजपकडून दोन वर्ष महापौर पदाचा आग्रह शिंदे सेनेकडे धरण्यात आला. मात्र, संख्याबळाचा विचार करता एक वर्ष देखील महापौर पद दिले जाणार नाही, असे शिंदेसेनेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर भाजपने समजूतीची भूमिका घेत उपमहापौर पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
महापौर पद मिळणार नसल्याचे निश्चित होताच स्थायी समिती अध्यक्षपद, परिवहन विभाग आणि विविध विषय व प्रभाग समित्यांची मागणी पुढे रेटण्यात आली. शिवसेना शिंदे गटाने भाजपला दोन वर्षांसाठी विषय आणि प्रभाग समित्या देण्याची तयारी दर्शवली आहे.
