‘… तर महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्या’
भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
मुंबई प्रतिनिधी
हे वर्ष हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने स्वतःला बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार समजणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपला सांगावे की, केंद्रात आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आहे. तुमच्या सोबत राहू. राज्यात तुमच्याबरोबर सत्तेत सहभागी आहे. तिथेही तुमच्या सबत राहू. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात महापालिकेवर खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊ, असेही जाधव म्हणाले.
आम्ही बाळासाहेबांमुळे घडलो असे म्हणणाऱ्यांनी आपला गर्व, मानापमान बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापालिकेत पाठिंबा द्यावा. कारण खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. तुम्ही पक्ष तोडला, चोरून नेला म्हणून तुम्ही काही मालक होऊ शकत नाही, असा टोला लगावताना भास्कर जाधव यांनी, भगवान के घर देर है अंधेर नही, असे उद्गारही काढले.
