जिल्हा परिषद मध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेत
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अनेक महानगरपालिकांवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे आपला मोर्चा वळवला आहे.. या संस्थांमध्ये आपले संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टीने स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जिल्हा परिषदांमध्ये दहा लोकनियुक्त सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य आणि पंचायत समित्यांमध्ये पाच लोक नियुक्त सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात आहे त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सुचित केले.
राज्याच्या शहरी भागात राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे भाजपने महापालिका निवडणुकीतून सिद्ध केले आहे. मात्र, राज्याच्या ग्रामीण भागात पूर्वापार काँग्रेस विचारांच्या पक्षांचा प्रभाव अधिक राहिला आहे. हा प्रभाव मोडून काढून ग्रामीण राजकारणातही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा स्वीकृत सदस्य हा भाजपासाठी एक मार्ग असणार आहे.
