शिवतीर्थावरील संयुक्त सभा म्हणजे सत्तेविरोधातील जनसंताप; परिवर्तनाची नांदी – संजय राऊत
मुंबई | प्रतिनिधी
शिवतीर्थावर ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेसाठी उसळलेली गर्दी ही केवळ संख्येची नव्हती, तर सत्ताधाऱ्यांविरोधात साचलेल्या असंतोषाचा उद्गार होता, असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला. एका सभेनेच राज्याच्या राजकारणात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांकडे केवळ शिवतीर्थावर उपस्थित असलेली गर्दीच नव्हे, तर महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी बांधवांचे लक्ष लागले होते. “कालचे भाषण तुफान होते. आमचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत,” असे राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी अदानी समूहासंदर्भात सादर केलेले प्रेझेंटेशन अभूतपूर्व होते, असा दावा करत राऊत म्हणाले की, “देशाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही इतक्या पुराव्यानिशी वास्तव मांडलेले नाही. संपूर्ण देश एका उद्योगपतीच्या ताब्यात दिला जातो आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे.” मुंबईची अस्मिता असलेले विमानतळ नवी मुंबईकडे हलवण्याचा कथित डाव, तसेच धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली जमिनी बळकावण्याचे आरोप राज ठाकरे यांनी पुराव्यासह मांडल्याचे त्यांनी सांगितले. “आता ‘सब भूमी गौतम अदानी की’ हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.
“आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे—मालक जगला तरच कामगार जगेल. गुंतवणूक आली तरच विकास होईल. मात्र भाजप जे करत आहे, त्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही. ही ‘वन विंडो सिस्टीम’च्या आडून चाललेली लूट आहे,” असा घणाघात त्यांनी केला. मुंबईचे महत्त्व कमी करून तिची आर्थिक राजधानीची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले, “सामान्य शिवसैनिकांच्या १०–१२ लाखांच्या व्यवहारांची चौकशी करणाऱ्या यंत्रणांना भाजप नेत्यांची १२४ कोटींची संपत्ती का दिसत नाही? पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांची चौकशी कधी होणार?”
