Sunday, June 14, 2026
Latest NewsSports

‌‘सोलारीस करंडक‌’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन

 
पुणे :  पुण्यामध्ये सलग बाराव्या वर्षी ‌‘सोलारीस करंडक‌’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे दि. १६ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. आपापल्या काळातील राष्ट्रीय विजेते आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षक असणारे दिग्गज्‌‍ वरिष्ठ खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
सव्वा-सहा लाख रूपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लब आणि ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटना (जीएसटीए) आणि रविंद्र पांड्ये टेनिस ॲकॅडमी (आरपीटीए) यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या भव्य स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लबच्यावतीने करण्यात आले असून स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडू सहभागी होणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहिती सांगताना सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली म्हणाले की, ज्या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय विजेतेपदके पटकावली असून आपल्या काळातील ते सर्वोत्तम खेळाडू होते, अशा अनेक वरिष्ठ आणि माजी खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. सलग अकराव्या वर्षी ही स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येत असून पुण्यामध्ये सोलारीस क्लबला या स्पर्धेचा आयोजनाचा मान सलग बाराव्यांदा मिळाला आहे.

ही स्पर्धा ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील, ५५ वर्षावरील, ६५ वर्षावरील, ७० वर्षावरील आणि ७५ वर्षावरील अशा सहा गटात होणार आहे. ही स्पर्धा एकेरी आणि दुहेरीमध्ये होणार आहे. जीएसटीए या संघटनेच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन होत असून वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी पुण्यातील युवा खेळाडूंना मिळणार आहे.

स्पर्धेमध्ये सुमारे ३०० खेळाडू सहभागी झाले असून याही वर्षी या स्पर्धेतील सामने चुरशीचे होतील, असा विश्वास हृषीकेश भानुशाली यांनी व्यक्त केला. स्पर्धेत महाराष्ट्रासह विशाखापट्टणम, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सोलारीस क्लब तर्फे सर्व खेळाडूंचे आदरतिथ्य मोफत करण्यात येणार असून त्यांना जेवण, नाश्ता यासह व्यायामशाळा आणि क्लबमधील इतर सवलतींचाही पुरेपुर लाभ घेता येणार आहे.

माजी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अव्वल मानांकित पुरूष गटातील मानांकित खेळाडू व पुण्यातील नितीन किर्तने, तसेच प्रशिक्षक रविंद्र पांड्ये, केतन धुमाळ, मंदार वाकणकर, अजय कामत, अभिषेक ताम्हाणे, संदीप किर्तने, जयंत कढे, नीलकंठ डाबरे तसेच नाशिकचे श्रीकांत पारेख, गुजरातच्या अजय लखोटीया आणि मुंबईच्या किशोर सबनानी, नीरज आनंद, भुषण अकूट असे मानांकित खेळाडू स्पर्धेत झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना गुणांसह करंडक आणि रोख पारितोषिके मिळणार आहेत. एकेरी गटाच्या विजेत्या खेळाडूला १२० गुण, उपविजेत्या ८५ गुण, उपांत्य फेरीतील खेळाडूंना ५५, उपांत्यपुर्व ३५ गुण, उप-उपांत्यपुर्व फेरीतील २० गुण मिळणार आहेत. पहिल्या फेरीतील खेळाडूंना १० गुण मिळणार आहेत. तसेच दुहेरी गटामध्ये विजेत्या जोडीला ८५ गुण, उपविजेत्या जोडीला ५५ गुण, उपांत्य फेरीतील जोडीला ३५ गुण, उपांत्यपुर्व २० गुण आणि उप-उपांत्यपुर्व जोडीला १० गुण मिळणार आहेत.

गतवर्षी स्पर्धेच्या एकेरी गटात मुंबईच्या नीरज आनंद (३५ वर्षावरील गट), पुण्याच्या नितीन किर्तने (४५ वर्षावरील गट), अजय कामत (५५ वर्षावरील), व्हि. शंकर (६५ वर्षावरील गट) आणि किशोर सबनानी (७० वर्षावरील गट) यांनी विजेतेपद मिळवले होते.

स्पर्धेची नावनोंदणी (साईनिंग) एकेरीसाठी १६ जानेवारी रोजी (सकाळी १० ते दुपारी १२) व दुहेरीसाठी १८ जानेवारी रोजी (सकाळी १० ते दुपारी १२) होणार आहे. स्पर्धेला १७ जानेवारीपासून पात्रता फेरींच्या सामन्यांपासून सुरूवात होणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी मुख्य रेफ्री रविंद्र पांड्ये (९८९०२१४३४३), गट संयोजक सुनैना श्रीवास्तवा (८३०८८३६६३६) किंवा क्लब समन्वयक राजेश सपकाळ (८३०८८३८०११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षीचे गटवार विजेते आणि उपविजेतेः
३५ वर्षावरील गटः संदीप पवार; निरज आनंद;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने; मंदार वाकणकर;
५५ वर्षावरील गटः अजय कामत; भुषण अकूत;
६५ वर्षावरील गटः व्हि. शंकर; मेहेर प्रकाश;
७० वर्षावरील गटः किशोर सबनानी; अजित पेंढारकर;

दुहेरी गटः विजेती आणि उपविजेती जोडीः
३५ वर्षावरील गटः संदीप पवार/देवेंद्र पिवळ; गणेश देवकिले/वैभव अवघडे;
४५ वर्षावरील गटः नितीन किर्तने/असित सैफ; मंदार वाकणकर/मदन गोखले;
५५ वर्षावरील गटः जयंत पवार/भुषण अकूत; अजय कामत/रामा राजू;
६५ वर्षावरील गटः मेहेर प्रकाश/व्हि. शंकर; एम. सुरेश/राजु शेखरन;
७० वर्षावरील गटः एस. पारेख/टी. पद्मालू; सागर इंजीनिअर/ ई. किणीकर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading