Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे यांचा पक्ष महापालिका निवडणुकीनंतर भाजप मध्ये विलीन होणार – खासदार संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना तसा सल्ला दिला आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

शिंदे यांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयात आपला बचाव करणे अशक्य आहे. ते शक्य झाले तर भारतीय न्यायव्यवस्थेवरील भारतीय जनतेचाच नव्हे तर जगाचा विश्वास उडेल, असे राऊत म्हणाले. भारतीय संविधान, लोकशाही याबाबत जगाच्या मनात शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे भयभयीत झालेल्या शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असे ते म्हणाले.

शिंदे यांनी चिन्ह आणि पक्ष चोरलेला आहे. त्यांना पक्ष समजलेला नाही. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यालये त्या त्या प्रदेशात असतात. दिल्लीत नाही. मात्र, यांचे मालक दिल्लीत बसलेले असल्यामुळे ते दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, अशी टीका राऊत यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी जवळ आली की यांचे पाय लटपटतात. मग हे दिल्लीत जातात. कधी मोदींना भेटतात. कधी शहांना भेटतात. रडगाणे गातात. छाती पिटतात आणि परत येतात, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे यांची खिल्ली उडवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading