महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांना शरण
सातारा: प्रतिनिधी
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर गोपाळ बदने फरार होता. काल रात्री तो स्वतः फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला.
फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपाळ बदने याला फलटण शहर पोलिसांकडे सुपूर्द केले. रात्री उशीरा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी दबाव आणण्यात आलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप गोपाळ बदने याच्यावर आहे. महिला डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर गोपाळ बदने आणि पोलीस शिपाई प्रशांत बनकर यांची नावे लिहून ठेवली होती.
बनकर याने डॉक्टरांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. त्याला यापूर्वीच पुण्यातून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला डॉक्टर बनकर याच्या वडिलांच्या घरात भाड्याने रहात होत्या.
