Monday, September 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

जैन बोर्डिंग हाऊसच्या व्यवहाराला रद्द करण्याचा प्रयत्न करणार – मुरलीधर मोहोळ

पुणे: प्रतिनिधी

जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन जैन बोर्डिंग हाऊसच्या व्यवहाराला रद्द करण्याचा प्रयत्न करणार असून जैन समाजाला त्यासाठी आंदोलन करावे लागणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या जैन बोर्डिंग हाऊसची निविदा काढून विक्री करण्यात आली आहे. विश्वस्तांच्या या निर्णयाला जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा व्यवहार रद्द न झाल्यास १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जैन गुरूंनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या वतीने मोहोळ यांना काल चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. यावेळी सुमारे दोनशे जैन बांधवांच्या उपस्थितीत मोहोळ आणि जैन मुनी यांच्यात चर्चा झाली. जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द करण्यासाठी विकासकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले.

या व्यवहारात मोहोळ यांनी आपली राजकीय ताकद आणि शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर हे सातत्याने करीत आहेत. संबंधित व्यवहारातील विकासक विशाल गोखले यांच्याशी मोहोळ यांची भागीदारी होती. मात्र, ही भागीदारी सन 2025 मध्ये संपुष्टात आल्याचा दावा मोहोळ यांनी केला आहे. तसेच जैन बोर्डिंग मालमत्ता व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading