Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘ग्रेट इंडिया’च्या उभारणीसाठी एशियाटिक सोसायटीतील ज्ञानसंपदा उपयोगात आणा : अमित शहा

मुंबई, १३ सप्टेंबर ( भारताच्या प्रगतीसह मानवकल्याणासाठी मुंबईतील एशियाटिक सोसायटीमध्ये जतन करण्यात आलेली ज्ञान, इतिहास आणि वारशाची समृद्ध संपदा व्यापक स्वरूपात उपयोगात आणण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केली.
एशियाटिक सोसायटीमध्ये ‘गणेश ज्ञानार्थी’ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना शहा म्हणाले की, खरे ज्ञान कोणत्याही वैचारिक चौकटीत किंवा विचारसरणीच्या सीमांमध्ये बंदिस्त राहता कामा नये. ज्ञानाला मुक्तपणे विकसित होण्याची आणि समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगात येण्याची संधी मिळाली पाहिजे.
एशियाटिक सोसायटीकडे असलेली पुस्तके, दस्तऐवज, हस्तलिखिते आणि विविध ऐतिहासिक साधने ही भारताची अमूल्य ज्ञानसंपदा असल्याचे त्यांनी सांगितले. ही संपदा ‘ग्रेट इंडिया’च्या उभारणीत कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते, याचा विचार करण्याची गरज आहे. ही संस्था कोणी, कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने स्थापन केली, यापेक्षा तिच्याकडे जतन असलेल्या ज्ञानाचा देशाच्या भविष्यासाठी कसा उपयोग करता येईल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे शहा म्हणाले.
भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, देशाची बौद्धिक आणि सांस्कृतिक परंपरा नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न इतिहासात झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा नाश केला जाऊ शकतो; मात्र भारतातील स्मरण आणि मौखिक परंपरेतून जतन झालेले ज्ञान नष्ट करता येत नाही, असे त्यांनी नमूद केले.
एखाद्या राष्ट्राची ताकद केवळ त्याच्या भौतिक किंवा आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर इतिहास, सामूहिक स्मृती, मूल्ये, भाषा, दस्तऐवज आणि परंपरा जतन करण्याच्या क्षमतेवरही ती अवलंबून असते, असे शहा यांनी सांगितले. ज्या राष्ट्राला आपल्या स्मृती, इतिहास, मूल्ये, भाषा आणि परंपरांचे संरक्षण करता येत नाही, ते कितीही सामर्थ्यवान असले तरी त्याचा ऱ्हास होण्यास वेळ लागत नाही, असे ते म्हणाले.
भारताच्या बौद्धिक वारशाचे ऐतिहासिकदृष्ट्या वसाहतवादी दृष्टिकोनातून झालेले मूल्यमापनही त्यांनी अधोरेखित केले. भारतीय ज्ञानपरंपरांचा अभ्यास अनेकदा भारताच्या स्वतःच्या बौद्धिक दृष्टिकोनातून न होता वसाहतवादी चौकटीतून करण्यात आला. त्यामुळे समाजात आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाबद्दल न्यूनगंड निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
एशियाटिक सोसायटी सध्याच्या नेतृत्वाखाली भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन आणि प्रसार करणारी महत्त्वाची संस्था म्हणून पुढे येईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. संस्थेत जतन असलेली ज्ञानसंपदा केवळ संग्रहालये आणि अभिलेखागारांपुरती मर्यादित न राहता देश, जग आणि मानवतेच्या हितासाठी उपयोगात आणली जावी, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading