जरांगे पाटील यांच्या १९ सप्टेंबरच्या आझाद मैदानावर आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार
मुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करण्यासाठी मागितलेल्या परवानगीला मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. प्रस्तावित आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार, वाहतूक आणि सार्वजनिक सेवांवर परिणाम होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागताना प्रशासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करण्याची हमी दिली होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांना हमीपत्रही सादर केले होते. मात्र, आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्राद्वारे ही परवानगी नाकारली आहे.
आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, न्यायालये, व्यावसायिक आस्थापना तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने आंदोलक शहरात दाखल झाल्यास सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
यापूर्वी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा अनुभवही पोलिसांनी निर्णय घेताना विचारात घेतला आहे. मागील आंदोलनाच्या वेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. परिणामी सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते.
मागील वेळी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांची उपस्थिती राहील, या अटीवर परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आंदोलक जमल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखताना प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर यावेळी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू असून या काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. अशा परिस्थितीत जरांगे यांच्या आंदोलनामुळे मोठी गर्दी झाल्यास या सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांकडून स्वतंत्र नोटीस बजावून परवानगीशिवाय आंदोलन न करण्याबाबत निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
