डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी – पंकजा मुंडे
बीड: प्रतिनिधी
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी डॉ. संपदा यांच्या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात वेगाने व निःपक्ष चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
डॉ. संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या खोलीत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला व शिपाई प्रशांत बनकर याने मानसिक छळ केला, असे हातावर लिहून ठेवले. शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता.
या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उंटच आहेत. डॉ संपदा यांनी आपल्यावर दबाव येत असल्याबद्दल वारंवार तक्रारी करून देखील पोलिसांकडून त्याची दखल घेतली गेली नाही. आमदार संदीप कांबळे, त्यांचा स्वीय सचिव व माजी खासदारांचा स्वीय सचिव यांच्याकडून डॉ. संपदा यांच्यावर दबाव आणला जात होता, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत.
